Sat, Jul 20, 2019 23:26होमपेज › Kolhapur › गुणवत्तेवरच ‘नॅक’चा नवा चक्रव्यूह भेदता येईल

गुणवत्तेवरच ‘नॅक’चा नवा चक्रव्यूह भेदता येईल

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 12:18AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

नॅक मूल्यांकनाचे बदललेले स्वरूप म्हणजे भारतीय उच्चशिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत विचारपूर्वक रचलेला चक्रव्यूह आहे. या चक्रव्युहास भेदण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी त्या तोडीची गुणवत्ताच प्रदर्शित कर आवश्यक ठरणार आहे, असे प्रतिपादन नॅक (बंगळूर) चे सल्‍लागार डॉ. जगन्‍नाथ पाटील यांनी शुक्रवारी  येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने ‘नॅक’ मूल्यांकनाच्या बदललेल्या स्वरूपाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

डॉ. पाटील म्हणाले,  भारतीय उच्चशिक्षणातील शहरी-ग्रामीण हा भेद लक्षात घेऊन ही दरी साधण्यासाठी काम करण्याची गरज नॅकला वाटते. त्यामधून मूल्यमापनाचे नवे निकष तयार करण्यात  आले.  नवनवीन अभिनव संकल्पना, प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देत असतानाच दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करण्याचे धोरण नॅकने स्वीकारले आहे. त्यासाठी हे धोरण ठरवित असताना देशाच्या उच्चशिक्षण क्षेत्रातील सर्वात्कृष्ट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यातूनच सिस्टीम जनरेटेड स्कोअर, स्टुडंट सॅटिसफॅक्शन सर्व्हे आणि पिअर टीम व्हिजिट असा गुणवत्ता वर्धनासाठीचा त्रिस्तरीय चक्रव्यूह रचणे नॅकला शक्य झाले. हा भेदावयाचा असेल, तर गुणवत्तेला पर्याय नाही. तिथे अन्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, उच्चशिक्षणासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत प्रत्येक घटकाने सज्ज राहण्याची गरज आहे. नॅकच्या नव्या मूल्यांकन पद्धतीत संबंधित संस्थेच्या बेस्ट प्रॅक्टीसेसना मोठे महत्त्व आहे. प्रत्येक संस्थेत अंगभूत अशा काही बेस्ट प्रॅक्टीसेस असतातच, नॅकमुळे त्या समाजासमोरच नव्हे, तर देशासमोर सादर करण्याची संधी मिळते. ही संधी प्रत्येक शिक्षण संस्थेने घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्यापीठाच्या आयक्यूएसी कक्षाचे समन्वयक डॉ. आर.के. कामत यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह संलग्‍नित महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिविभागांचे प्रमुख व शिक्षक उपस्थित होते.