होमपेज › Kolhapur › संशयावरून ‘त्या’ कुटुंबांना हाकलले

संशयावरून ‘त्या’ कुटुंबांना हाकलले

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:42PMतुरंबे : वार्ताहर

येथील जंगल हद्दीत संशयास्पद फिरणार्‍या फासेपारधी सदृश्य समाजातील कुटुंबांना तुरंबेचे सरपंच आणि ग्रामस्थांनी हाकलून लावले. त्यांच्याकडे जंगली प्राण्याची शिकार करण्याची जाळी आणि इतर साहित्य होते. येथील काही शेतकर्‍यांनी या समाजातील लोकांना जंगल हद्दीत पाहिले होते. त्यांनी ही माहिती सरपंचांना दिली. यावेळी या समाजातील महिलांनी आम्ही फासेपारधी नसून आदिवासी लोक असल्याचे सांगितले.

तुरंबे (ता. राधानगरी) येथील जंगल हद्दीत काही समाजातील कुटुंब आल्याची माहिती येथील शेतकरी तानाजी भावके, रघुनाथ भावके यांनी सरपंच जयश्री भोईटे यांना दिली. सरपंचांचे पती संभाजी भोईटे यांनी वन विभागाला ही माहिती दिली आणि जंगल हद्दीत शोध मोहीम सुरू केली. यावेळी पठारावर 3 झोपड्या दिसून आल्या. यामध्ये काही महिला आणि लहान मुले होती. त्यांना पुरुषमंडळी कुठे आहेत असे विचारले असता, जंगलात गेली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना बोलावून घेण्यास सांगितले. थोड्या वेळाने हातात शिकारीची जाळी घेऊन काही तरुण तेथे आले. 

त्यांना भोईटे यांनी तुम्ही जंगलात काय करता? असे विचारत येथे राहायचे नाही असे सांगितले. यावर यातील महिलांनी आम्ही जंगलातील मध काढून विकतो. पोटासाठी रानामाळात फिरत असतो, असे सांगितले. मात्र, ग्रामस्थांनी तुम्ही चोर्‍या करता असा आरोप करत येथे राहायचे नाही, असे सांगून त्यांच्या झोपड्या काढून त्यांना हाकलून लावले. ज्या परिसरात हे लोक राहिले होते तेथे प्रचंड पाऊस आणि वारा असतो तर चारीही बाजूंनी घनदाट जंगल आहे. अशा अडचणीच्या ठिकाणी राहून तुम्ही परिसरात चोर्‍या करता असा आरोप ग्रामस्थांनी केला. यावर एका महिलेने आपले आधार कार्ड दाखवले, आमचा समाज कोल्हापुरात राहत असून पोटासाठी आम्ही जंगलात फिरत असल्याचे सांगितले.

या समाजातील महिला आणि मुले येथील गणपती मंदिराजवळ थांबलीत तर पुरुष शेतवडीतूनच पसार झालेत.  यांची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.