होमपेज › Kolhapur › कामगारांची मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरू करा

कामगारांची मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरू करा

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 18 2018 11:41PMकोल्हापूर  : प्रतिनिधी

 बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरू करा, विटभट्टी कामगारांची नोंदणी चालू करा, घर बांधकामासाठी 10 लाख रुपये अनुदान द्यावे, या व अशा अन्य मागण्यांसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कामगारमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 

दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून बांधकाम कामगारांच्या जिव्हाळ्याची असणारी मेडिक्लेम योजना शासनाने बंद केली आहे. कामगार आयुक्त कार्यालयात निवेदने देऊनही काही उपयोग झालेला नाही. 60 वर्षांवरील बांधकाम कमागारांना महिना 3 हजार रुपये पेन्शन मिळावी, आचार संहितेच्या काळात कामगारांची नोंदणी व नूतनीकरण करणे चालू करा, 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान सरसकट करा, प्रलंबित योजनांचे लाभ लवकर निकालात काढा, दर दिवाळीला सानुग्रह अनुदान नोंदीत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना द्यावे,  आजरा, चंदगड व गडहिंग्लज येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करा, चालू असलेल्या योजनांची वेळेत अंमलबजावणी करावी, तसेच बांधकाम कामगारांची कर्जे माफ करावीत, अशी मागणी करण्यात आली.  पंधरा दिवसांत या मागण्यांबाबत विचार न झाल्यास कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या निवासस्थानी 25 जानेवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शिंदे यांनी सहायक कामगार आयुक्तांसोबत बैठक घेऊ, असे सांगितले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष गुणवंत नागटीळे, संतोष गायकवाड, अभिजित केकरे, संजय सुतार, अमोल कुंभार, लता चव्हाण, प्रताप चव्हाण, जयश्री सावंत, जनाबाई सुतार, अमर सुतार व कार्यकर्ते व जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.