Mon, May 20, 2019 22:11होमपेज › Kolhapur › पावन खिंड स्मृतिदिन ‘पदभ्रमंती’पुरता नको...

पावन खिंड स्मृतिदिन ‘पदभ्रमंती’पुरता नको...

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 12 2018 11:53PMकोल्हापूर : सागर यादव

सह्याद्री पर्वत रांगेतील पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर 12 व 13 जुलै 1660 या दिवशी शिवछत्रपती आणि त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्य रक्षणार्थ अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या जाज्वल्य पराक्रमाच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी 13 जुलै हा दिवस ‘पावन खिंड संग्रामदिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त विविध संस्था-संघटनांच्या वतीने ‘पन्हाळगड ते पावन खिंड’  या साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते. हजारोंच्या संख्येने लोक दरवर्षी पदभ्रमंती मोहिमेत सहभागी होतात. भर पावसात, धुक्यातून, चिखलमय रस्त्यावरून जाणारी ही मोहीम बहुतांश लोक  केवळ  ‘ट्रेक’ म्हणूनच ‘एन्जॉय’ करतात.  वास्तविक, पावन खिंडीचा इतिहास ‘पदभ्रमंती’पुरता मर्यादित न राहता तो शिवछत्रपतींचा गनिमी कावा, युद्ध कौशल्य, बांदल-मराठा सैनिकांचा अद्वितीय पराक्रम, त्यांची स्वराज्य निष्ठा यासह विविध पैलूंनी अनुभवण्याची गरज आहे. आज, शुक्रवारी 358 वा पावन खिंड स्मृतिदिन असून, या निमित्त...

पन्हाळगडाला सुमारे चार महिने असणारा आदिलशाही सरदार  सिद्दी जौहरचा वेढा शिताफीने फोडून शिवछत्रपतींनी  दि. 12 जुलै 1660 रोजी विशाळगडाकडे कूच केली. शत्रू सैन्याला चकवा देण्यासाठी हुबेहूब दिसणार्‍या शिवा काशिद यांना पालखीतून दुसर्‍या मार्गावरून पाठविले. शिवराय स्वत: दुसर्‍या पालखीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जुन्या वाटेवरून रवाना झाले. इकडे  शिवा काशिद यांची पालखी शत्रू सैन्याने ताब्यात घेतली. पालखीत  शिवाजी नसून त्यांच्या वेशातील गुप्तहेर असल्याचे समजताच चिडलेल्या सिद्दीने शिवा काशिद यांना ताबडतोब मारून टाकले. 

पांढरेपाणी ते भाततळी परिसरात रणकंदन

वेढा फोडून विशाळगडाकडे निघालेल्या शिवरायांना पकडण्यासाठी शत्रू सैन्य लगोलग रवाना झाले. पांढरेपाणी (तत्कालीन चौकेवाडी) येथे या सैन्याने शिवरायांना गाठले. दोन्ही सैन्यात प्रचंड रणकंदन सुरू झाले. स्वत: शिवछत्रपतींसह रायाजी नाईक-बांदल, बाजी व फुलाजीप्रभू  देशपांडे, संभाजी जाधव, विठोजी काटे व त्यांच्या सहकार्‍यांनी  शत्रू सैन्याशी हातघाईची लढाई केली.  पांढरेपाणी ते पावन खिंड (तत्कालीन घोडखिंड) या सुमारे  6 किलोमीटर परिसरात तुंबळ युद्ध झाले. शिवछत्रपतींनी निम्मे सैन्य या परिसरात ठेवून विशाळगडाकडे कूच केली. गडाच्या पायथ्याशी पुन्हा त्यांना युद्ध करावे लागले. गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी ताज्या दमाची फौज आपल्या सहकार्‍यांच्या मदतीसाठी पाठविली. तोपर्यंत अनेक मावळ्यांनी रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणार्पण केले होते. या मावळ्यांचा उचित सन्मान करण्यासाठी शिवछत्रपतींनी त्यांच्या समाध्या बांधल्या, त्यांच्या मुला-बाळांना स्वराज्यात चाकरी दिली. त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी जमिनी दिल्या. 

फरसबंदी मार्गाचे जतन गरजेचे...

सध्या पावन खिंड परिसरातील नैसर्गिक घळीला पावन खिंड म्हणून संबोधिले जाते. या घळीत पाण्याचा प्रचंड प्रवाह असतो. यात नुसते उभे राहणेही कठीण असते. त्यामुळे या घळीत लढाई करणे केवळ अशक्यच. त्यामुळे या युद्धाशी या घळीचा संबंध नाही. वास्तविक, हे युद्ध या नैसर्गिक घळीपासून अलीकडे असणार्‍या दगडी फरसबंदी (जुना रस्ता) मार्गावर झाले होते. पांढरेपाणी ते भाततळी या सुमारे 6 कि.मी. अंतराच्या परिसरात अटीतटीची लढाई झाली आहे. या मार्गावर फरसबंदीचे अवशेष ठिकठिकाणी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. याबाबतचे संशोधन इतिहास संशोधकांनी केले आहे. त्यामुळे पन्हाळा ते विशाळगड मार्गावरील संपूर्ण फरसबंदीचे संशोधन आणि जतन-संवर्धन करणे गरजेचे आहे.

सखोल संशोधनाच्या संधी...

12 व 13 जुलै 1660 या कालवधीतील इतिहास केवळ पन्हाळा ते पावन खिंड यादरम्यान घडला नसून, तो पन्हाळगड ते  विशाळगड या मार्गावर घडला आहे. स्वत: शिवछत्रपतींनाही आदिलशाही सैन्याविरोधात लढाई करावी लागली होती. रायाजी नाईक-बांदलसारख्या अनेक वीरांची नावे दुर्लक्षित आहेत. अशा बांदल-मराठा वीरांची नावे प्रकाशात येणे गरजेचे आहे.  पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर ठिकठिकाणी अज्ञात वीरांच्या समाधी आहेत, त्या कोणाच्या, याचे संशोधन गरजेचे आहे. दगडी फरसबंदी मार्गाचे अवशेष कोठे-कोठे शिल्लक आहेत? त्यांचे जतन-संवर्धन, संरक्षण कसे करता येईल? पांढरेपाणी गावचा इतिहास, तेथील शिवछत्रपतींची विहीर या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. शिवा काशीद-बाजीप्रभू यांच्यासोबत लढलेले इतर वीर कोण? त्यांची नावे काय? त्यांच्या समाधी कोठे आहेत? या सर्वांचे वंशज सध्या कोठे आहेत, अशा विविध  गोष्टींवर अभ्यास करण्याच्या संधी इतिहास संशोधकांना उपलब्ध आहेत. याबाबत अधिक संशोधन झाल्यास पावन खिंडीच्या इतिहासाचे आणि पर्यायाने पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर काळाच्या पडद्याआड दुर्लक्षित राहिलेले पैलू लोकांसमोर येऊ शकतील.