Mon, Nov 12, 2018 23:23होमपेज › Kolhapur › यापुढे गनिमी काव्याने आंदोलन

यापुढे गनिमी काव्याने आंदोलन

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 1:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ व 80 तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी, रविवारी सकाळी अचानक शिवाजी पुलावर घोषणाबाजी करून रास्ता रोको करीत, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्याची मागणी केली. रास्ता रोकोमुळे परिसरात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. येथून पुढे कोणतीही सूचना न देता गनिमी काव्याने आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ऐतिहासिक दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. विविध पक्ष, सामाजिक संघटना, गावांचा आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीने सात तालीम संस्था, परिसरातील 80 तरुण मंडळांचे कार्यकर्ते, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’ अशा घोषणा देत शिवाजी पुलावर जमले. मोठ्या प्रमाणात जमलेल्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्याने वडणगे फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहराकडे येणारे रस्ते बंद झाल्याने काही काळ वाहतूक  विस्कळीत झाली होती.

रास्ता रोकोवेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा पुलावर तैनात होता. शिवाजी पुलावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची वाहतूक सुरळीत करताना दमछाक झाली. आंदोलनात माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, जुना बुधवार तालीम पेठेचे अध्यक्ष धनंजय सावंत, उदय भोसले, सुशील भांदिगरे, पिंटू स्वामी, दीपक देसाई, नामदेव आवटे, प्रवीण डांगे, संदीप राणे, राहुल घाडगे यांच्यासह तालीम मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.