Sun, Apr 21, 2019 05:49होमपेज › Kolhapur › डेंग्यूबाबत अधिकार्‍यांनी सतर्क रहावे

डेंग्यूबाबत अधिकार्‍यांनी सतर्क रहावे

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

डेंग्यूबाबत सर्व अधिकार्‍यांनी सतर्क राहून आपले मोबाईल सुरू ठेवावेत, आरोग्य निरीक्षकांनीप्रभागात स्वच्छता ठेवून परिसर डेंग्यूमुक्त ठेवावा, अशा सूचना महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी दिल्या. शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी आयोजित अधिकारी, पदाधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत त्या बोलत होत्या.

घरामध्ये औषध फवारणीसाठी आलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍यांना नागरिकांनी सहकार्य करावे. आपल्या भागामध्ये तापाच्या संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सौ. बोंद्रे  यांनी केले आहे. उपमहापौर महेश सावंत यांनी शहरातील झोपडपट्टी व गरीब गरजू रुग्णांना अल्पदरात औषधोपचार करण्यात यावा. प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम हाती घ्यावी. नागरिकांमध्ये डेंग्यूबाबत पसरलेली भीती कमी करण्यासाठी जनजागृती करावी, अशा सूचना मांडल्या.आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी नूतन महापौर व उपमहापौर यांचे  स्वागत केले.  

ताप आलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करून महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना कळविणेत आले आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शहरात एकूण 300 पथके तयार करण्यात आलेली आहेत. आजअखेर शहरात सर्वेक्षण केलेली एकूण 77 हजार 608 इतकी घरे आहेत. यामध्ये डास व अळी सापडलेली एकूण 1630 इतकी घरे आहेत. जानेवारीपासून आजअखेर 52 लोकांना डेंग्यूची लागण झालेली आहे. आरोग्य विभागाकडे कीटकनाशके व जंतुनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला असल्याची माहिती डॉ. रमेश जाधव यांनी दिली. सभागृह नेता दिलीप पवार यांनी शहरात नालेसफाई सुरू आहे का? भागातील गटर स्वच्छ करा, धूर व औषध फवारणी महिन्यातून किती वेळा करता? याबाबत विचारणा केली.

मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी शहरातील नाल्यांची सफाई सुरू असून कर्मचार्‍यांकडून छोटे 476 नाल्यांपैकी 420 नाल्यांची सफाई करण्यात आलेली आहे. जेसीबीच्या सहाय्याने करण्यात येणारी 336 नाल्यांपैकी 177 नाल्यांची सफाई करण्यात आलेली आहे. तसेच यावेळी गोमती व जयंती नाल्यांची पोकलँडद्वारे 13 कि.मी. पैकी 7.5 कि.मी.चे काम पूर्ण केले आहे. उर्वरित सर्व नाल्यांची 5 जूनपर्यंत सफाई पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक प्रभागात आठवड्यातून 2 वेळा धूर फवारणी व 15 दिवसांतून एकदा औषध फवारणी करण्यात येत आहे, असे सांगितले.

यावेळी परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, शिक्षण समिती सभापती सौ. वनिता देठे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्रभाग समिती सभापती सौ. शोभा कवाळे, अति. आयुक्त श्रीधर पाटणकर, सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.