Wed, Jun 26, 2019 12:07होमपेज › Kolhapur › ठराविक अधिकारी-कर्मचार्‍यांची मक्‍तेदारी

ठराविक अधिकारी-कर्मचार्‍यांची मक्‍तेदारी

Published On: May 03 2018 1:41AM | Last Updated: May 03 2018 12:31AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अधिकारी-कर्मचारी राहिल्याने कार्यालयात ये-जा करणार्‍यांशी त्यांचे लागेबांधे निर्माण होऊ नयेत. त्यातून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळू नये. या उद्देशाने शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा नियम झाला. एकाच टेबलला जास्तीत जास्त तीन वर्षे सेवा करावी, असा शासन नियम आहे; पण महापालिकेत हा नियम अक्षरशः पायदळी तुडवला जात असल्याचे वास्तव आहे. 

सुमारे एक हजारावर अधिकारी-कर्मचार्‍यांनी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठिय्या मारला आहे. त्या-त्या कार्यालयात त्यांची मक्‍तेदारी झाली असल्याने त्यांची ‘बडदास्त’ केल्याशिवाय नागरिकांचे काम होत नसल्याचे वास्तव आहे. मोठ्या प्रमाणात ‘खाबूगिरी’ वाढलेली आहे. नगररचना विभागातील भ्रष्टाचारामुळे तर नागरिक मेटाकुटीस आले आहेत. 

महापालिकेत वर्ग 1 ते 4 च्या अधिकारी-कर्मचार्‍यांची एकूण 4 हजार 698 पदे मंजूर आहेत. त्यापैकी वर्ग (1) - 16, वर्ग (2) - 181 पदे मंजूर आहेत. वर्ग (3) - 805 पदे व वर्ग (4) 3 हजार 696 पदे आहेत. एकूण 745 पदे रिक्‍त असून, 3 हजार 953 कार्यरत आहेत. महापालिकेत गांधी मैदान विभागीय कार्यालय (क्र. 1), छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय (क्र. 2), राजारामपुरी विभागीय कार्यालय (क्र. 3), छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय (क्र. 4) आहेत. त्याबरोबरच थेट नागरिकांशी संबंधित असलेल्या नगररचना विभागासह घरफाळा, परवाना, इस्टेट, विद्युत, बागा खाते, सार्वजनिक स्वच्छता, पवडी विभाग आहेत. यातील कर्मचार्‍यांचा कुणालाच कुणाचा थांगपत्ता नसतो. 

फिरतीच्या नावाखाली अधिकारी-कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे यापूर्वी अनेकवेळा उघड झाले आहे. त्याबरोबरच विभागीय कार्यालयांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचेही निष्पन्‍न झाले आहे. महापालिकेत यापूर्वी कधीच मोठ्या प्रमाणात बदल्या झालेल्या नाहीत. काही कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या, तरीही राजकीय हस्तक्षेपामुळे संबंधित कर्मचारी आहे त्याच विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचे सांगण्यात येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात यापूर्वी काही अधिकारी-कर्मचारी अडकल्याने महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. काही अधिकारी तर रोज एका ठेकेदाराला गाठून पार्टीचे ‘गणित’ घालत असल्याची चर्चा आहे. 

धनादेश लिहिणारे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी

अनेक कर्मचार्‍यांना फक्‍त नगररचना, घरफाळा, अतिक्रमण, पवडी, नगदी विभाग, लेखा विभाग, आरोग्य किंवा इतर ‘मलई’दार विभागांतच नेमणूक हवी असते. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी या विभागात अक्षरशः ठिय्या मारला आहे. नगदी विभागात फक्‍त धनादेश लिहिणारे कर्मचारी वर्षानुवर्षे तेच काम करत आहेत. याचा अर्थ असा होतो की, महापालिकेतील इतर कोणत्याही कर्मचार्‍यांना धनादेशावर आकडे लिहिता येत नाहीत. शिपाई व कामगारांना क्‍लार्क किंवा वसुलीची कामे देण्यात येत आहेत. एकच कर्मचारी कामे मंजूर करणे, बिले तयार करणे, बिले आदा करणे अशी कामे करत असल्याने भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा आहे. 

एका खोलीतून दुसर्‍या खोलीतही नको बदली 

महापालिका मुख्य इमारत, चार विभागीय कार्यालये, नगररचना विभाग, घरफाळा विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी विखुरले आहेत. आस्थापना विभाग तर मुख्य इमारतीतच आहे. तरीही बदलीसाठी अनेक कर्मचारी नाराजी व्यक्‍त करतात. एका खोलीतून दुसर्‍या खोलीत बदली होऊ नये, यासाठी ते धडपडत असतात. नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींचा दबाव अधिकार्‍यांवर आणतात. गांधी मैदानातून ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयातही बदली होऊन जाण्यासाठी कर्मचारी तयार नसतात.

ठराविक कर्मचार्‍यांसाठी वरिष्ठही आग्रही

विशिष्ट कर्मचार्‍यांना आपल्याच विभागात ठेवून घेण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी आग्रही असताना दिसतात. एकतर संबंधित कर्मचारी प्रामाणिकपणे राहून काम करत असतील. त्यामुळे विभागप्रमुख किंवा संबंधित अधिकार्‍यांचे काम ‘हलके’ होत असेल किंवा एकाच विभागात राहिल्याने संबंधित कर्मचार्‍याला सारेच ‘व्यवहार’ माहिती झालेले असतात. त्यामुळे ‘सेटलमेंट’साठीही त्यांचा वापर केला जातो. त्यामुळेच अधिकारी ठराविक कर्मचार्‍यांसाठी आग्रही असतात का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.