Sun, Jul 21, 2019 14:08होमपेज › Kolhapur › पाठिंबा द्या अन् कोटीची उड्डाणे घ्या

पाठिंबा द्या अन् कोटीची उड्डाणे घ्या

Published On: May 11 2018 1:56AM | Last Updated: May 11 2018 12:07AMकोल्हापूर : सतीश सरीकर

पक्षाचा शिक्‍का असला तरी गल्लीतील निवडणूक असल्याने उमेदवाराचे ‘स्वकर्तृत्वच’ महत्त्वाचे असते. त्याच्या जोरावरच नगरसेवक निवडून येतात, असे सांगितले जाते. तरीही सामान्य नगरसेवकाची दखल पक्षीय पातळीवर घेतली जात नाही. मिरवणार्‍यांचा आणि कारभार्‍यांचा मात्र रुबाब असतो. कोल्हापूर महापालिकेतील काही वर्षे त्याला अपवाद नव्हती. मात्र, आता विरोधी पक्ष स्ट्राँग असल्याने सत्ताधार्‍यांसह विरोधकांतील नगरसेवकांनाही ‘अच्छे दिन’ आल्याची चर्चा आहे. महापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीने होणार असल्याने एकेका मताला ‘मोल’ प्राप्त झाले आहे. परिणामी ‘पाठिंबा द्या अन् कोटीची उड्डाणे घ्या’ अशा बेधडक ‘ऑफर’ नगरसेवकांसाठी खुल्या झाल्या आहेत.

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काठावरचे बहुमत असल्याने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले आहे. भाजप-ताराराणी आघाडीविरोधी बाकावर आहे. सत्ताधारी व विरोधकांत टोकाची ईर्ष्या आहे. त्यावरून त्यांच्यात सभागृहात नेहमीच संघर्षाची ठिणगी पडते. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक एकमेकांशी बोलणे लांबच, साधे बघून हसतही नाहीत, हे वास्तव आहे. आता तर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महापौरपदाची निवडणूक ‘प्रतिष्ठेची’ केली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकमेकांपासून चार हात लांबच राहत आहेत.   

कितीही नाही म्हटले तरी प्रत्येक नगरसेवकाने निवडून येण्यासाठी ‘खर्च’ केलेलाच आहे. महापालिकेत आल्यावर खर्च निघेल अशी अनेकांची अपेक्षा होती; परंतु गेल्या अडीच वर्षांतील स्थिती पाहता का म्हणून इतका पैसा खर्च करून नगरसेवक झालो, असे काहीजण महापालिका चौकात बोलून दाखवतात. साहजिकच त्यांना खर्च ‘वसूल’ करायचा आहे, हे स्पष्ट होते. मात्र, त्या पद्धतीचे ठराव किंवा प्रस्ताव नसल्याने गप्प राहण्याशिवाय पर्याय नाही. कारभारी नगरसेवक मात्र ‘हात मारून रिकामे’ होत असल्याचे अनेक नगरसेवक उघड्या डोळ्याने पाहत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील नगरसेवकांत तीव्र नाराजी आहे. अडीच वर्षे संपले तरी काहीही हातात पडले नसल्याने अनेकजण घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ऑफरची चाचपणी केली जात आहे. जास्तीत जास्त काय होणार आहे? असे म्हणून काय होईल ते होईल... बघू नंतर म्हणून ऑफरबाबत विचार करत असल्याचे नगरसेवक सांगत आहेत.  

भाजप - ताराराणी आघाडीच्या वतीने भाजपचाच महापौर करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समिती सभापती निवडणुकीत केलेल्या खेळीची पुनर्रचना होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नगरसेवकांना कोटीच्या उड्डाणाच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यानुसार वाटाघाटीही सुरू आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई झाल्यास ठामपणे पाठीशी राहण्याची ग्वाही दिली जात आहे. तसेच पोटनिवडणूक लागल्यास पुन्हा निवडून आणण्याची तयारीही दाखविण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेतील काही नगरसेवक धाडस करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, तर काँग्रेसच्या वतीनेही कोणत्याही स्थितीत महापालिकेतील सत्ता हातातून जाऊ नये यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. 

विधान परिषदेवेळी मोठी किंमत!

विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना मतदानाचा हक्‍क असतो. कोल्हापूर जिल्ह्यातून फक्‍त 382 मतदान असल्याने विजयासाठी एकेक मत महत्त्वपूर्ण असते. त्यासाठी ‘अर्थ’पूर्ण चर्चा होते. परिणामी नगरसेवकाला विधान परिषद निवडणुकीवेळी ‘मोठी किंमत’ असते; परंतु सहा वर्षांतून एकदाच नगरसेवकांसाठी ही नामी ‘संधी’ येते. त्यातच त्यांना काय हात धुऊन घ्यायचे ते घ्यावे लागतात, अन्यथा पुढील विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागते. महापालिकेच्या विद्यमान सभागृहातील नगरसेवकांना पुढील विधानसभेत मतदान करण्याची संधी येणार नसल्याने हे नगरसेवक गांभीर्याने विचार करत आहेत. परिणामी आताच मिळवून रिकामे होऊया... असे नगरसेवक खासगीत बोलत आहेत.