Tue, Mar 19, 2019 12:10होमपेज › Kolhapur › ‘देवस्थान’कडील दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण

‘देवस्थान’कडील दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 05 2018 1:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

साडेतीन शक्‍तिपीठापैकी एक असणार्‍या करवीर निवासिनी अंबाबाई देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने  मूल्यांकन करण्यात आले. दरवर्षी देवीला अर्पण होणार्‍या  दागिन्यांचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये हिरे, माणिक व रत्नजडीत दागिन्यांचा समावेश आहे. गरूड मंडप येथे सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात हे मूल्यांकन करण्यात आले. 

अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी विविध राज्यांतून येणार्‍या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत  आहे. पूर्वी ठराविक सण व उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असे. पण, आता नवरात्र उत्सव, रथोत्सव, दिवाळी, उन्हाळी सुट्ट्यांमुळे अंबाबाई दर्शनाला भाविकांचा ओघ वाढू लागला आहे. मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी  देवीला विविध अलंकार अर्पण केले जातात. बोललेला नवस फेडण्यासाठी दागिने अर्पण करण्याची प्रथा आजही कायम आहे.  या दागिन्यांचे दरवर्षी मूल्यांकन केले जाते. 

सन 2017-18 चे मूल्यांकन नुकतेच मुंबईचे  शासकीय मूल्यांकनकार पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे (मिरज), उमेश पाठक (कोल्हापूर) यांनी केले. यामध्ये सोन्याचे छत्र चामर, हार, किरीट, नाणी, बिलवर, तोडे, नथ, कर्णफुले, गंठण, सोन्याच्या मूर्ती, भांडी यासह हिरेजडीत नथ, कर्णफुले, चांदीचा शंख, गणपती मूर्ती,  चांदीची कळशी, चांदीची ताट-वाटी याशिवाय हिरे, माणिक, रत्नजडित दागिन्यांचा समावेश आहे.

यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्या सौ. संगीता खाडे, बी. एन. पाटील-मुगळीकर, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पवार, शिवाजी साळवी, धनाजी जाधव उपस्थित होते. दरम्यान, देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, त्यांचे एकूण मूल्य किती आहे, हे दोन दिवसांत जाहीर करू, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.