Fri, Jul 19, 2019 05:16होमपेज › Kolhapur › चित्रनगरीसाठी निधी देऊ : ना. पाटील

चित्रनगरीसाठी निधी देऊ : ना. पाटील

Published On: Aug 28 2018 1:26AM | Last Updated: Aug 27 2018 11:31PMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

कलेचे माहेरघर म्हणून ओळख असणार्‍या कोल्हापुरातील चित्रनगरी ही कलाप्रेमींची अस्मिता आहे. चित्रनगरीच्या विकासासाठी निधीची तरतूद करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. निधीसाठी कोणतेही काम थांबणार नाही, असेही त्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. दरम्यान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने कोल्हापूर चित्रनगरी कृती समितीची स्थापना केली आहे.

दै. ‘पुढारी’मध्ये ‘कोल्हापूरच्या चित्रनगरीची दुरवस्था’ याबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली. याबाबत ना. पाटील यांनी दै. ‘पुढारा’शी बोलताना सांगितले की, अनंत माने जन्मशताब्दी कार्यक्रमात कोल्हापूरच्या चित्रनगरीचा प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर त्याच कार्यक्रमात मी चित्रनगरीसाठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे सुरुवातीच्या टप्प्यात 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातून स्टुडिओ विकासाची कामे झाली आहेत. परिपूर्ण चित्रनगरीसाठी आणखी निधीची गरज असल्याचे समजले आहे. हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.

दरम्यान, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने कोल्हापूर चित्रनगरीच्या कामाबाबत शासन व महामंडळ यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी चित्रनगरी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे मेघराज भोसले असून, रणजित जाधव, धनाजी यमकर, शरद चव्हाण, सतीश बिडकर, आकाराम पाटील, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, रवींद्र गावडे, यशवंत भालकर, अमर मोरे यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
याबाबत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी, शासनस्तरावर चित्रनगरीच्या विकासाच्या दुसर्‍या टप्प्यातील निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले. सध्या चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालकपदही रिक्‍त आहे. यासाठी कोणताही अतिरिक्‍त कार्यभार असणारा अधिकारी न देता स्वतंत्र अधिकारी देण्याची मागणी शासनाकडे करणार आहे. चित्रनगरीच्या भाडे दरात अजून काय बदल करणे गरजेचे असतील, तर त्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच अजून जी रिकामी जागा आहे तेथे लोकेशन उभारण्यासाठी समिती मार्गदर्शन करत राहील. म्हणूनच या समितीत चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.

चित्रनगरी कृती समितीची आज बैठक
दै. ‘पुढारी’तील वृत्तमालिकेची दखल घेऊन महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी चित्रनगरी कृती समितीची स्थापना केली. या समितीची मंगळवारी दुपारी साडेचार वाजता चित्रपट महामंडळात बैठक होणार आहे. या बैठकीत चित्रनगरीबाबत पुढील रूपरेषा ठरवण्यात येणार आहे.