Thu, Apr 25, 2019 13:44होमपेज › Kolhapur › कोल्हापूरसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस देऊ : गडकरी

कोल्हापूरसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस देऊ : गडकरी

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेने राज्य शासनामार्फत 50 इलेक्ट्रिक बसेस मागणीचा प्रस्ताव द्यावा. त्याला तत्काळ अनुमती देऊ, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महापालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीच्या तीस नगरसेवकांनी दिल्ली अभ्यास दौरा काढला आहे. त्यांतर्गत नगरसेवकांनी मंत्री गडकरी यांची भेट घेऊन विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. यावेळी गडकरी यांनी कोल्हापूर शहराला समस्यामुक्‍त करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मंत्रालय विभाग सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्‍वासनही सोमवारी दिले. 

नगरसेवकांनी संसदेचे कामकाज कसे चालते? हे पाहण्यासाठी संसदेत उपस्थिती लावली. त्यानंतर खासदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी मंत्री गडकरी यांची भेट घेतली. कोल्हापूरसाठी बदलत्या काळानुसार पर्यावरणपूरक व कमी खर्चाच्या बसेस उपलब्ध व्हाव्यात. त्यांतर्गत नागपूरच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेलाही इलेक्ट्रिक किंवा इथेनॉलवर चालणार्‍या बसेस मिळाव्यात, अशी मागणी केली. बसेस देण्याची ग्वाही देऊन गडकरी यांनी सांगितले की, या बसेस महापालिकेला मोफत मिळतील. केवळ ठरलेल्या प्रति किलोमीटर दरानुसार बसपुरवठा करणार्‍या कंपनीला पैसे अदा करावेत. या बसेसच्या चालकांचा व देखभाल दुरुस्तीचा खर्चही महापालिकेला करावा लागणार नाही. तसेच इथेनॉलवर चालणार्‍या बसेसही देण्यास गडकरी यांनी संमती दर्शविली.

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पुलाला पर्यायी पूल बांधण्याचे काम रखडले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर गडकरी यांनी पुरातत्त्व खात्याच्या कायद्यात बदल होण्यासाठी लोकसभेत मंजुरी झाली आहे. मात्र, राज्यसभेत अद्याप या विधेयकाला मंजुरी मिळालेली नाही. याबाबत तोडगा काढण्यासाठी खासदार महाडिक यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार केंद्र सरकार विशेष अध्यादेश काढेल आणि पर्यायी पुलाचे काम पूर्ण करू, अशी ग्वाहीही गडकरी यांनी दिली.

यावेळी महापालिकेतील स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, राजाराम गायकवाड, शेखर कुसाळे, संतोष गायकवाड, विलास वास्कर, कविता माने, सीमा कदम, अर्चना पागर, स्मिता माने आदींसह नगरसेवक उपस्थित होते.