Wed, May 22, 2019 23:13होमपेज › Kolhapur › 10 टोळ्यांतील 64 जण गजाआड

10 टोळ्यांतील 64 जण गजाआड

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 19 2018 11:48PMइचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजी शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, चोरी आदींसह संघटित गुन्हेगारी करून दहशत माजवणार्‍या शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्याचे हत्यार पोलिसांनी उपसले आहे. यांतर्गत अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी ‘मोका’ कारवाईचा धडाका लावला आहे.

आजअखेर सुमारे 10 टोळ्यांवर ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात आली असून, 64 जणांना कारागृहात धाडण्यात आले आहे. त्यामुळे या कारवाईचा शहरातील गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला आहे. आणखी काही टोळ्या पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत. त्यामुळे काही जणांच्या कारवाया थंडावल्या आहेत, तर काहींनी शहर सोडून अक्षरश: पलायन केले आहे. 
इचलकरंजी शहर व परिसरातील वाढत्या नागरीकरणाबरोबरच येथील समस्याही वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, चोर्‍या, अवैध व्यवसाय, वर्चस्ववाद आदींसह गुन्हेगारीचा आलेख चढताच राहिला आहे. इचलकरंजीसह परिसरातील शहापूर, खोतवाडी, तारदाळ, यड्राव आदींसह अन्य भागांतही विशेषत: औद्योगिक वसाहतीतही गुन्हेगारांचे चांगलेच वर्चस्व निर्माण झाले आहे. काही पोलिसांनी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम केल्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. यामुळेच गुन्हेगारही निर्ढावले होते.

 त्यामुळे एकमेकाचा मुडदा पाडण्याबरोबरच इतरांचा जीव घेण्यासाठीही मागेपुढे पाहिले जात नाही. त्यामुळेच शहरात खून, खुनाचा प्रयत्न, हाणामार्‍या या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. 
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी टोळ्या निर्माण करून लूट करणार्‍या गुन्हेगारांमुळे त्याचा फटका शहराच्या विकासावरही होत होता. त्यामुळे गुन्हेगारी कारवाया रोखण्याबरोबरच गुंडांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत धाक दाखवण्यासाठी पोलिसांनी शहरात पाऊल उचलले. शहापूर येथील अमोल माळी, णेशनगरमधील गुंड्या उर्फ मुन्ना मुसा जमादार, शाम लाखे, विठ्ठल शिंदे, सनी बगाडे, प्रवीण रावळ, सुदर्शन बाबर, उमेश आरबोळे, अविनाश जाधव उर्फ जर्मनी, चंद्रकांत लोहार आदी 9 टोळ्यांवर मोक्‍कांतर्गत कारवाई करीत या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असलेल्या जर्मनी टोळीवर दुसर्‍यांदा मोक्‍कांतर्गत कारवाई करीत दहाव्या टोळीलाही कारागृहात धाडण्यात आले आहे. 

इचलकरंजी शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच कायद्यापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजणार्‍या आणि गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण करणार्‍या टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानंतर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी मोक्‍का कारवाईसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी इचलकरंजी पाठोपाठ जयसिंगपूर, शिरोळ तालुक्यातील काही टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले आहे. मोक्‍कांतर्गत आणखीन काही टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यासाठीही प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या मोक्‍काच्या कारवाईमुळे किमान काही वर्षे गुन्हेगार कारागृहाच्या आड राहणार असल्याने त्यांच्या कारवाया थंडावणार आहेत. 

काही वर्षे कारागृहात जावे लागणार असल्यामुळे गुन्हेगारांमध्येही मोक्‍काची चांगलीच भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी गुन्ह्यांपासून लांब राहणे तर काहींनी शहर सोडणे पसंत केले आहे. पोलिसांचा गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचा धडाका असाच कायम राहिल्यास इचलकरंजी शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास वेळ लागणार नाही.