Tue, Jul 23, 2019 11:50होमपेज › Kolhapur ›

फिरत्या व्यावसायिकांचा वाहतुकीला अडथळा

फिरत्या व्यावसायिकांचा वाहतुकीला अडथळा

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 12:40AMकोल्हापूर : सागर यादव 

खुल्या अर्थव्यवस्थेमुळे कोणालाही-कोठेही व्यापार करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. मात्र, याचा सर्वत्र गैरफायदाच घेतला जात असल्याचे वास्तव आहे. विविध प्रकारचा माल विक्री करणार्‍या फिरते व्यावसायिक मनाला येईल तेथे दुकान थाटतात. मुख्य चौक, रस्त्यांच्या दुतर्फा असणारे पदपथ, मुख्य रस्त्यांच्या साईड पट्ट्या  त्यांच्यामुळे वाहतुकीच्या रस्त्यांवर अडथळा निर्माण होत आहे. 

प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. यामुळे त्याला व्यावसाय पर्याय आहे. कोणी कोणता व्यवसाय करावा याला कोणाचेही बंधन नाही. यामुळे सर्वत्र विविध प्रकारचा उद्योग-व्यापार-व्यावसाय करणार्‍यांची संख्या सात्तत्याने वाढत आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, या व्यवसायामुळे कोणालाही नाहक त्रास होऊ नये याची काळजी घेणे ही त्या व्यावसायिकाची जबाबदारी आहे; पण नेमकी ही बाबच विसरली जात आहे. स्थानिक प्रशासनाने व्यापाराबाबत घालून दिलेले कोणत्याही नियमांची अंमलबजावणी या व्यापारी लोकांकडून केली जात नाही. व्यापारासाठी नेमून दिलेली जागा, वाहनांचे पार्किंग, स्थानिक प्रशासनाचा  व्यवसाय व इतर कर याबाबत कसलीही बंधने पाळली जात नाहीत. 

रहदारीच्या रस्त्यावर कोठेही, कशीही वाहने पार्क करून बिनधास्त व्यापार केला जात आहे. थेट फुटपाथवर वाहन चढविणे, एका बाजूची दोन चाके फुटपाथवर आणि दोन रस्त्यावर अशा पद्धतीचे धोकादायक पार्किंग करणे, मुख्य चौकाच्या कॉर्नरला दुकान थाटने असे प्रकार ठिकठिकाणी सुरू आहेत. त्यांच्यावर कोणाचेही निर्बंध नसल्याचे चित्र आहे. 

नियम पाळणार्‍यांचा तोटा 
कोणतेही निमय न पाळता मनाला येईल तेथे आपले वाहन पार्क करून दुकान थाटणार्‍या फिरत्या व्यापार्‍यांची चांदी होत आहे. याउलट  वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद, महापालिका यांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच (फेरीवाला झोन) दुकान थाटणारे प्रामाणिक व्यावसायिकांना नियम पाळण्याचा तोटा सहन करावा लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

कारवाई करायची कोणी? 
फिरत्या व्यावसायिकांना हटकले असता आम्ही रोड टॅक्स भरला असल्याचे उत्तर त्यांच्याकडून दिले जाते. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला कारवाईबाबत बंधने येत असल्याचे सांगितले जाते. ही कारवाई आरटीओकडून व्हावी, असे उत्तर त्यांच्याकडून मिळते. यामुळे अशा व्यावसायिकांना शिस्त लावणार कोण? असा प्रश्‍न आहे. हा निर्णय होईपर्यंत फिरता व्यवसाय वाहतुकीचा रस्त्यांना अडथळाच ठरणार आहे. 
 

Tags : kolhapur city, Obstructing, traffic, commercial vehicles