कोल्हापूर : प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याच्या भाडे करारातील अटींचा भंग केल्यावरून हा कारखाना भाड्याने घेतलेल्या न्यूट्रिएन्स कंपनी व जिल्हा बँकेत निर्माण झालेला वाद प्रमुख जिल्हा न्यायाधीश लवेकर यांनी आज जिल्हा विधी व न्याय प्राधिकरणाकडे वर्ग केला. हा वाद तडजोडीने मिटवा, नाही मिटला तर न्यायालय दखल घेईल, असे लवेकर यांनी सुचवले. प्राधिकरणासमोर 21 ऑगस्टला कंपनी व जिल्हा बँकेचे प्रतिनिधी यांना समोरासमोर बसवून चर्चा होणार आहे.
दरम्यान, या दाव्यात आपल्यालाही प्रतिवादी करून घ्यावे, असा अर्ज दौलत कारखान्याच्या संचालकांच्या वतीने अॅड. पी. जी. वाघ यांनी दाखल केला.
दौलत भाड्याने घेतलेल्या कंपनीने जिल्हा बँकेच्या या कारखान्यावरील कर्जापोटी असलेल्या रकमेचा एक हप्ता न दिल्याने बँकेने कंपनीशी असलेला भाडे करार रद्द केला. त्यानंतर या कारखान्याचा ताबा गुरुवारी (ता. 16) बँकेकडून घेतला जाणार होता, पण तत्पूर्वीच कंपनीने प्रमुख जिल्हा न्यायाधीश लवेकर यांच्या न्यायालयात या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
आज या प्रकरणाच्या सुनावणी
दरम्यान प्रमुख जिल्हा न्यायाधीश लवेकर यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे सचिव असलेल्या जिल्हा विधी व न्याय प्राधिकरणाकडे सोपवले. आपण हे प्रकरण वाचले असून यात तडजोड
शक्य असल्याने हे प्रकरण प्राधिकरणाकडे हस्तांतर करत असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले. या प्रकरणात बँकेच्या वतीने अॅड. लुईस शहा तर कंपनीच्या वतीने अॅड. अभिजित कापसे यांनी बाजू मांडली.