Thu, Jul 18, 2019 04:48होमपेज › Kolhapur › ‘न्यूट्रियन्स’- दौलत करार रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू

‘न्यूट्रियन्स’- दौलत करार रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू

Published On: May 11 2018 1:55AM | Last Updated: May 11 2018 1:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चालविण्यास घेत असताना, न्यूट्रियन्स कंपनीने केलेल्या कराराचा भंग केला आहे. त्यामुळे या कंपनीबरोबर झालेला करार रद्द करण्यासाठी बँकेच्या कायदेशीर सल्‍लागारांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर न्यूट्रियन्सचा करार रद्द केला जाईल.

करार रद्द झाल्यानंतर कारखाना चालविण्यास देण्यासाठी फेरनिविदा काढली जाईल. त्यामध्ये शेतकर्‍यांची चालू वर्षाची एफ.आर.पी., कामगारांची देणी आणि बँकेचे व्याज या बाबी एकत्रित करून निविदेतील रक्‍कम निश्‍चित केली जाईल. निविदेतील रक्‍कम भरण्यासाठी जी कंपनी तयार होईल आणि कमीत कमी दिवसासाठी निविदा भरेल, अशा कंपनीला हा कारखाना चालविण्यास दिला जाईल, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासमोर बोलताना स्पष्ट केले. 

एफ.आर.पी., कामगारांची देणी थकल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेने दौलत साखर कारखाना चालविणार्‍या न्यूट्रियन्स कंपनीशी असलेला करार रद्द करावा. तोपर्यंत बँकेने आपल्याकडील रक्‍कम शेतकरी आणि कामगारांना द्यावी, या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हा बँकेत जाऊन अध्यक्ष आ. मुश्रीफ यांना निवेदन देऊन चर्चा केली. 

आ. मुश्रीफ म्हणाले, थकीत कर्जापोटी सिक्युरिटी अ‍ॅक्टखाली दौलत साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या ताब्यात घेतला आहे. या कारखान्याची विक्री करू नये, भाड्याने चालविण्यास द्या, अशी चंदगड तालुक्यातील शेतकरी आणि कारखाना कामगारांची मागणी आहे. बँकेने निविदेतून मांडलेले मुद्दे न्यूट्रियन्स कंपनीने मान्य केले, त्यामुळे कंपनीला 45 वर्षांच्या मुदतीने भाडे करारावर हा कारखाना चालविण्यास दिला आहे. भाडे कराराने देत असताना 74 कोटीला कारखाना दिला आहे.

त्यातील 37 कोटी रुपये कंपनीने भरले आहेत. उर्वरित रक्‍कम भरण्यासाठी पाच वर्षांचे हप्‍ते पाडून दिले आहेत. 8 कोटी 61 लाखांचा पहिला हप्‍ता होता. हा हप्‍ता भरण्याची मुदत मार्च 2018 अखेर होती; पण कंपनीने या हप्त्यातील एक रुपयाही भरला नाही. यासाठी बँकेने कंपनीला स्मरणपत्र पाठविले होते; पण कंपनीने कराराचा भंग केला आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी चर्चा 27 एप्रिलच्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाली आहे.

त्यानुसार बँकतर्फे न्यूट्रियन्स कंपनीला एक महिन्याची रितसर नोटीस देणार आहे. कंपनीला पैसे भरता येत नसतील तर कंपनीने बँकेशी केलेला करार रद्द करून बँकेला पुढील मार्ग मोकळा करून द्यावा, तसेच न्यूट्रियन्स कंपनीचे प्रमुख अप्पी पाटील आहेत. हेच पाटील जिल्हा बँकेचे उपाध्यक्षही आहेत.  या शिष्टमंडळात प्रा. सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, संज्योती मळवीकर, अ‍ॅड. संतोष मळवीकर, अनिल केडगे, राजेंद्र पावसकर, प्रदीप पवार आदींचा समावेश होता.