Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Kolhapur › नृसिंहवाडीत दत्त जयंती उत्साहात

नृसिंहवाडीत दत्त जयंती उत्साहात

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 1:38AM

बुकमार्क करा

नृसिंहवाडी : वार्ताहर

वाडी ग्रामी जाऊ, दत्तचरण पाहू... कृष्णेमध्ये न्हाऊनी, आपण पावनची होऊ... असा भाव मनात धरून लाखो भाविकांनी, मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती सोहळा, असा दुहेरी संगम साधत रविवारी दत्त दर्शन घेतले. दरम्यान, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ असा अखंड नामघोष करत सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा झाला. पहाटे चार वाजल्यापासून मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.

उत्सवानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती, षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी पवमान पठण व पंचपदी कीर्तन झाले. दुपारी चार वाजता श्री उत्सवमूर्ती मंदिराच्या गाभार्‍यात आणण्यात आली. यावेळी ह. भ. प. संदीप बुवा मांडके यांचे कीर्तन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा झाला. अबीर-गुलालाची उधळण करण्यात आली. रात्री उशिरा धूप, दीप, आरती व पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला. जन्मकाळ सोहळ्यानंतर उत्सवाचे मानकरी विनोद भानुदास पुजारी, संजय पुजारी, दत्तात्रेय पुजारी, नारायण पुजारी यांच्या गणेश कुंज मंगल कार्यालयात श्रींचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला.

श्री दत्त प्रभूंची राजधानी व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात रविवारी दत्त जयंती सोहळा असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री बारा वाजल्यापासून नृसिंहवाडी-शिरोळ- कुरूंदवाड मार्गावर शेकडो भाविक दत्तनामाचा जप करीत थंडीत येत होते. सामाजिक संस्था, मंडळांकडून भाविकांना मोफत चहा, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. तीन ते चार तास पायी प्रवास करीत आलेल्या भाविकांच्या चेहर्‍यावर दर्शन घेतल्यावर आनंद मावत नव्हता.

देवस्थान व ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कुरूंदवाड एस. टी. आगाराच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. व्हाईट आर्मी, दत्त मंदिर हायस्कूल व एन.सी.सी.चे विद्यार्थी यांच्यासह देवस्थानचे अध्यक्ष राजेश खोंबारे, सचिव दामोदर संत, सर्व विश्‍वस्त, कर्मचारी व सरपंच अरूंधती जगदाळे, उपसरपंच अशोक पुजारी यांच्यासह सर्व सदस्य ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.

पोलिसांचे नेटके नियोजन कन्यागत महापर्वकाळपेक्षाही रविवारी दत्त जयंती सोहळ्याला दोन ते तीन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिरोळचे पोलिस निरीक्षक उदय डुबल, सहायक पोलिस निरीक्षक समीर गायकवाड, पी. एस. आय. रूकगे, पोलिस कॉन्स्टेबल  राजेंद्र धुमाळ, अमित पवार, प्रवीण जाधव यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी वाहतुकीचे नेटके नियोजन केले.