होमपेज › Kolhapur › आता ग्रामपंचायतीत भरा वीज बिल!

आता ग्रामपंचायतीत भरा वीज बिल!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील सकटे 

शहरात वीज बिल भरणा केंद्रे, ऑनलाईन बिल भरणा आदी माध्यमातून ग्राहकांची सोय आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनाही अशी सुविधा देण्यासाठी महावितरण कंपनीने ज्या त्या ग्रामपंचायतीमध्ये वीज बिल भरण्याची सोय केली आहे. याबाबतचा आदेश नुकताच काढण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात काही गावांत ही सोय केली असून, दुसर्‍या टप्प्यात सर्वच ठिकाणी अशी सुविधा देण्यात येणार आहे. 

महावितरणमार्फत सहकारी बँका, पतसंस्था, महावितरण कर्मचारी सहकारी संस्थांमार्फत वीज बिल वसुलीची यंत्रणा कार्यरत आहे. या सर्व सुविधा प्रामुख्याने शहरी भागात आहेत. शहरी भागातील सुविधा आता ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी महावितरण कंपनीने थेट ग्रामपंचायत कार्यालयातच वीज बिल भरणा करून घेण्याचे आदेश काढले आहेत. महाराष्ट्रातील 28 हजार 64 ग्रा.पं.पैकी तब्बल दहा हजार 64 ग्रा.पं.मध्ये ही सुविधा पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. उर्वरित 18 हजार ग्रामपंचायतींमध्येही लवकरच ही सोय केली जाणार आहे. 

कोल्हापूर झोनमधील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1,735 ग्रामपंचायतींपैकी 720 ग्रामपंचयातींमध्ये वीज बिल भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 1029 पैकी 379 ग्रामपंचायतींमध्ये आणि सांगली जिल्ह्यात 704 पैकी 341 ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा देण्यात आली आहे. शासनाने सुरू केलेल्या  आपले सरकार सेवा केेंद्रात ही वीज बिल भरणा करण्याची सुविधा आहे.  महाऑनलाईन सेवेद्वारे ग्रामीण भागात विविध ई-गव्हर्नन्स सेवा सुरू केली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात वीज बिल भरणा करण्याची सेवा देण्याचे आदेश महावितरणच्या वित्त व लेखा विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापकांनी राज्यातील सर्व अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत.