Mon, Jan 21, 2019 21:56होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात आता आयसीयूचे भाडे केवळ 400 रुपये

कोल्हापुरात आता आयसीयूचे भाडे केवळ 400 रुपये

Published On: Jun 23 2018 1:57AM | Last Updated: Jun 23 2018 1:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दिवसाला हजारामध्ये आकारण्यात येणारे अतिदक्षता विभागाचे भाडे दिवसाला केवळ चारशे रुपये आकारण्यात येणार असल्याचे कोणी सांगितले तर त्यावर आपला विश्‍वास बसणार नाही, पण ही सुविधा सामान्य नागरिकांसाठी महापालिकेने सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपलब्ध करून दिलासा दिला आहे. ही रक्कम अन्य ठिकाणच्या तुलनेत खूपच कमी आहे.

महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सावित्रीबाई फुले रुग्णालयात सामान्य लोकांना परवडतील अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापूर्वी सावित्रीबाई फुले रुग्णालयात स्कॅनिंग, एक्सरे तसेच अन्य काही तपासण्या अतिशय कमी शुल्कामध्ये सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.  

महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचा प्रारंभ आज आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महापौर सौ.शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

 या अतिदक्षता विभागसाठी महिला व बालकल्याण समितीच्या वतीने 55 लाख देण्यात आले आहेेत. महापालिका निधीमधून बांधकामासाठी 13 लाखांची तरतूद करण्यात आली होती. अतिदक्षता विभागात 55 लाखांच्या निधीतून आवश्यक साधनसामुग्री खरेदी करण्यात आली आहे. अत्यंत सुसज्ज असा अतिदक्षता विभाग आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या आपल्या काळात डॉ. संदीप नेजदार या हॉस्पिटलसाठी विशेष तरतूद केली होती.

यावेळी उपमहापौर महेश सावंत,  सुरेखा शहा, सौ. वनिता देठे, सौ. शोभा कवाळे, गटनेता शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले रुग्णालयात आज अतिदक्षता विभागाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आले होते. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या काही विभागांना भेटी दिल्या. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या काही भागात कामे सुरू आहेत. एका काम तीन लाखांचे होते त्यावर 13 लाख खर्च करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्त डॉ. चौधरी यांनी संबंधित इंजिनिअरला त्याचठिकाणी चांगलेच फैलावर घेतले. वाढीव काम करत असताना परवानगी का घेतली नाही, याचा खुलासा करण्यास सांगितले.