कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेवर आता 70 सीसीटीव्ही कॅमेर्यांचा वॉच राहणार आहे. महापालिका इमारतीमधील कार्यालयासह मुख्य प्रवेशद्वार व बाहेरही या कॅमेर्यांची नजर राहणार आहे. मंगळवारपासून कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले. आठवड्यात सर्व कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल सात लाखांचा खर्च केला आहे. कॅमेरे बसविल्यामुळे अधिकारी-कर्मचार्यांना होणार्या दादागिरीसह विविध विभागांतील अनागोंदी बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापौरांसह पदाधिकार्यांच्या कार्यालयासह पॅसेजमध्येही कॅमेरे बसविले जाणार नाहीत.
आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, दोन सहायक आयुक्त यांच्यासह शहर अभियंता कार्यालय, प्रोजेक्ट विभाग, नगररचना विभाग, आरोग्यधिकारी, पवडी विभाग, सामान्य प्रशासन, मुख्य लेखापरीक्षक कार्यालय, अंतर्गत लेखापरीक्षक कार्यालय, जनसंपर्क कार्यालय, मुख्य आरोग्य निरीक्षक, अग्निशमन दल अधिकारी, नागरी सुविधा केंद्र, भांडार विभाग यासह इतर विभाग आहेत. अनेक विभागांत अधिकारी-कर्मचारी जागेवर नसतात. त्यामुळे नागरिकांची व नगरसेवकांचीही कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. काहीवेळा अधिकारी-कर्मचार्यांना नगरसेवक किंवा माजी नगरसेवकांकडून दादागिरी होते. त्यामुळे सर्वच अधिकार्यांच्या केबिनमध्ये, विभागात व पॅसेजमध्ये कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मनपा चौकातही कॅमेर्यांची नजर राहणार आहे. दोन मेगा पिक्सलचे आय. पी. कॅमेरे असणार आहेत.
पदाधिकार्यांच्या कार्यालयांना सूट
मनपा इमारतीतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्या कार्यालयासह सर्व गटनेत्यांच्या कार्यालयात व पॅसेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार नाहीत.