Wed, Jul 24, 2019 12:26होमपेज › Kolhapur › आता मिळणार विषमुक्त भाजीपाला, फळे

आता मिळणार विषमुक्त भाजीपाला, फळे

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 26 2018 11:18PMकागल : बा. ल. वंदूरकर

राज्यातील शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर, तसेच कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. त्यानुसार सेंद्रिय शेती विषमुक्त शेतीच्या राज्यपुरस्कृत योजनेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन करण्यात आले असून, या मिशनला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतीमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य ग्राहकांना नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहेत.

 सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे. पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, ही प्रणाली सक्षम प्राधिकार्‍यांच्या मान्यतेने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे. सेंद्रिय शेतीमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे. सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे. सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाधिकरण करून घेणे आदी उद्दिष्टे या मिशनच्या माध्यमातून सध्या करण्यात येणार आहेत. याच मिशनच्या माध्यमातून स्थानिक ग्राहकांना विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध करण्याचा शासनाचा निर्धार आहे.

राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेंद्रिय शेती विषमुक्त शेती या योजनेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या याबाबत मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सेंद्रिय शेतीसाठी राज्यपुरस्कृत स्वतंत्र योजना प्रस्तावित करण्यात येत आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढल्यामुळे जमिनीतील जैविक घटकांचा विनाश होऊन त्या मृतवत होत चालल्या आहेत. तसेच तणनाशके, कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता कमी झाली आहे. या सार्‍याचा परिणाम म्हणून उत्पादित शेतीमालात आरोग्यास अपायकारक अशा रासायनिक घटकांचे प्रमाण वाढून त्याचे मानवी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत आहेत.