Fri, Aug 23, 2019 15:45होमपेज › Kolhapur › उपाध्यक्ष, ‘शिक्षण’साठी इच्छुकांत रस्सीखेच

उपाध्यक्ष, ‘शिक्षण’साठी इच्छुकांत रस्सीखेच

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:23PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलासाठी आता नेत्यांमध्ये पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. आपापल्या मतदारसंघात पद नेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. सद्यस्थितीत महिला-बालकल्याण वगळता सर्व पदांसाठी रस्सीखेच आहे. विशेषत:, शिक्षण व उपाध्यक्षपदावर शिवसेनेच्या दोन गटांतच चढाओढ सुरू आहे. पदवाटपाच्या नव्या सूत्रात जनसुराज्यचे एक पद कमी होऊन शिवसेनेचे वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पुढील आठवड्यात पदाधिकारी बदलाबाबत पालकमंत्र्यांसमवेत बैठक होणार असली, तरी संभाव्य नावांची आतापासूनच जोरदार चर्चा सुरू आहे. जनसुराज्य व शिवसेनेच्या भूमिकेकडे जास्त लक्ष आहे. कारण, सध्या या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी दोन याप्रमाणे चार पदे आहेत. व्यक्‍ती बदलल्या, तरी पद आपल्याकडेच कायम राहावे, यासाठी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा आग्रह आहे. जनसुराज्यकडे बांधकाम सभापतिपद आहे. या पदासाठी पन्हाळा तालुक्यातील शंकर पाटील व शिवाजी मोरे दोघेही इच्छुक आहेत. जनसुराज्यने समाजकल्याणसाठी पुष्पा आळतेकर यांचे नाव घेतले आहे; पण महिला-बालकल्याण व अध्यक्षपद हातकणंगले तालुक्यात असल्याने समाजकल्याण अन्य पक्षाच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी उपाध्यक्षपद सोडतो; पण त्याबदल्यात समाजकल्याणवर दावा सांगितला आहे. उपाध्यक्षपदावर मिणचेकर गटाने दावा सांगितला आहे; पण त्यांनाही हातकणंगले तालुक्याचा अडसर येत असल्याने या पदावर शाहूवाडीच्या आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी दावा केला आहे. त्यांनी हंबीरराव पाटील यांच्यासाठी आग्रह धरला आहे. 

सद्यस्थितीत शिवसेनेमध्येच इच्छुकांची संख्या जास्त असून, शिक्षण व उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर या पक्षाच्या नेत्यांनी आपला दावा कायम ठेवला आहे. विद्यमान सभागृहात ही दोन्ही पदे शिवसेनेकडेच आहेत. सध्याच्या मागणीनुसार, शिवसेनेकडे सहापैकी तीन पदे जात असल्याने अन्य पक्षांच्या नेत्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. एकूणच पदवाटपाचे नवे सूत्र नेत्यांची आणि इच्छुकांची कसोटी पाहणारे ठरणार असल्याचे दिसत आहे.

Tags : Kolhapur, Now, post, office, bearer,  Zilla Parishad,