Wed, Jul 24, 2019 05:42होमपेज › Kolhapur › यापुढे शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने

यापुढे शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षण संस्थांतील शिक्षक भरती ही संस्थाचालकांकडून पैसे घेऊनच केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे यापुढे शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीनेच केली जाईल, अशी घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी केली.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात तावडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील होते.

दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी शाळांतून 20 गुण देण्याची पद्धत पुढील वर्षीपासून बंद करण्यात येणार असल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

तावडे म्हणाले, डॉ. बापूजी साळुंखेंनी सुरू केलेली स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल किंवा भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था, अशा संस्थांमुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे मनापासून या संस्थांचे अभिनंदन केले पाहिजे. ग्रामीण भागातसुद्धा अतिशय हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षणाची संधी दिली, तर ते या राज्याचे, देशाचे चित्र बदलतील. हे स्वप्न त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बापूजी साळुंखे अशा अनेकांनी पाहिले.

ते म्हणाले, अनेक शिक्षण संस्थांत शिक्षक भरतीची माहिती घेतली, तर कोणी पाच लाख, कोणी दहा लाख संस्थेला दिले. जमिनी, घर, सोने विकून, कर्ज काढून काहींनी पैसे दिल्याचे पुढे आले. म्हणून यापुढे ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीनेच केली जाईल. शिक्षक भरतीत कोणालाही तांबडा पैसासुद्धा संस्थेला द्यावा लागणार नाही. भविष्यात प्राध्यापकांची भरतीही याच पद्धतीने केली जाईल.
ते म्हणाले, सहावी ते दहावीची परीक्षा म्हणजे केवळ पाठांतराशिवाय काही नव्हते. हा अभ्यासक्रम बदलला. आपण माहिती देतो की, ज्ञान देतो, याची स्पष्टता नव्हती, ती आणण्याचा प्रयत्न केला. यावर्षी दहावीचा निकाल 89 टक्के लागला. पुढील वर्षीपासून शाळांतून दिले जाणारे वीस गुण बंद करणार आहे, त्यामुळे हा निकाल 70 टक्क्यांपर्यंत खाली येईल. याबाबत काही शाळांचा अभ्यास केला असता 92 टक्के शाळांत 20 पैकी 18 ते 19 गुण दिले गेले आहेत. आपण कोणाला फसवतो आहोत, दहावी पास करून पुढे पाठवू; पण त्याला आपण आयुष्यात नापास करायचे काम करतो, म्हणून हे गुण बंद करणार आहे.

ते म्हणाले, शिक्षण ज्या पद्धतीने चालते, त्यात थोडा बदल करायचा मी प्रयत्न करतो. कोणताही बदल केला, तर स्वाभाविकपणे विरोध आणि समर्थनही होते. मंत्री झाल्यानंतर आढावा घेत असताना गुणवत्तेकडे लक्ष न देता शाळा मान्यता, शिक्षक भरती, वेतन निश्‍चिती यातच शिक्षण अडकल्याचे दिसले. ज्यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे, त्याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. केंद्राच्या मनुष्यबळ मंत्रालयाच्या आदेशाने राज्यात एससीईआरटी सुरू केले. अभ्यासक्रम एससीईआरटी तयार करणार आणि त्यावर बालभारती लिहिणार असे कधी होते का? विचार एकाचा, दुसर्‍याने लिहायचे हे शक्य नाही, म्हणून हे दोन्ही एकत्र आणण्याचे काम मी केले.

ते म्हणाले, चांगले शिक्षक असल्यामुळेच प्रगत शैक्षणिक शाळांत, जि.प. शाळांत 25 हजार मुले इंग्रजी शाळेतून आली. हे या शिक्षकांचे श्रेय आहे. आम्ही फक्त अ‍ॅक्टिव्हिटी बेस शिक्षण व स्पोकन इंग्लिश सुरू केले. या प्रयोगातून दर्जेदार शिक्षण देणे शक्य आहे. दहावीतील नापास विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्‍न समजावून घेतले. यापुढे त्यांच्या नावापुढील नापास शिक्का पुसून काढला. अनेकांनी या निर्णयावर टीका केली, माझे डोके फिरले आहे, असेही काही जण म्हणाले; पण याच विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा लगेच घेऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविले. त्यावेळी या विद्यार्थ्यांचे आयुष्यच वाचवल्याची प्रतिक्रिया उमटली.

संस्थेचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. बापूजी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून संस्थेच्या 393 शाखांत मुलींसाठीच्या स्वच्छतागृहांसाठी लागेल तेवढा निधी देऊ. त्याचा आराखडा तयार करा.  शासनाकडूनही संस्थेला निधी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, त्यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल.

डॉ. बापूजी साळुंखे यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, महापौर शोभा बोंद्रे, डाक अधीक्षक आय. डी. पाटील यांची भाषणे झाली. प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले. आभार सचिव सौ. शुभांगी गावडे यांनी मानले. कार्यक्रमाला आ. अमल महाडिक उपस्थित होते.