Thu, May 23, 2019 04:48होमपेज › Kolhapur › जिल्हा निवड मंडळाकडून यापुढे नोकर भरती

जिल्हा निवड मंडळाकडून यापुढे नोकर भरती

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 1:30AMकोल्हापूर : अनिल देशमुख

कोणत्याही विभागात, केव्हाही होणारी रिक्‍त पदांची भरती आता वेळेत होणार आहे. सर्व शासकीय विभागांतील सरळ सेवेने नियुक्‍त केल्या जाणार्‍या गट ‘ब’, ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील भरतीसाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ भरती प्रक्रिया राबविणार आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी 15 जून ते नोव्हेंबरअखेर या कालावधीत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

राज्य शासनाच्या दुय्यम सेवेतील गट ‘क’मधील उमेदवारांची निवड करण्यासाठी सहा. प्रादेशिक दुय्यम सेवा मंडळ व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ अस्तित्वात होते. मात्र, 11 जून 1999 साली ही दोन्ही मंडळे राज्य शासनाने बरखास्त केली. यानंतर विविध विभागांकडून स्वतंत्रपणे भरती प्रक्रिया राबविली जात होती. भरती प्रक्रियेत एकसूत्रता, नि:पक्षपातीपणा व समान दर्जा असावा, उमेदवारांना समान संधी मिळावी, या हेतूने राज्य शासनाने भरती प्रक्रियेसाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ज्या संवर्गातील पदांच्या भरतीसाठी मंत्रालयीन विभागाकडून स्वतंत्र कार्यपद्धती राबविली जाते (उदा. पोलिस शिपाई, शिक्षणसेवक आदी) अशी पदे वगळून सरळ सेवेने भरण्यात येणारी गट ‘ब’ व ‘क’ आणि गट ‘ड’मधील भरती प्रक्रिया निवड मंडळाकडून केली जाणार आहे. यासह ज्या पदांची भरती विभागीय अथवा राज्य पातळीवरून केली जाणार आहे, त्याकरिता प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड मंडळांचीही स्थापना केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील भरती मात्र ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने केल्या जाणार आहेत.

...अशी असेल जिल्हा निवड समिती

जिल्हाधिकारी - अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा आदिवासी विकास अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व ज्या कार्यालयातील, विभागातील पदे भरायची आहेत, त्या कार्यालयाचे, विभागाचे प्रमुख अथवा त्याचे वर्ग ‘अ’ दर्जाचे अधिकारी असलेले प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश असेल. जिल्हाधिकारी वर्ग ‘अ’ दर्जाच्या अधिकार्‍यांना सचिव म्हणून नियुक्‍त करतील. निवड समितीतील सदस्यांत एक अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्ग या मधील एक, अल्पसंख्याक प्रवर्गातील एक आणि महिला एक असे प्रतिनिधी असले पाहिजेत. संबंधित निवड समितीत असे प्रतिनिधी नसतील, तर त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

लेखी परीक्षा होणार

सर्व पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे. 200 गुणांची परीक्षा घेतली जाईल, त्याकरिता मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी याकरिता प्रत्येकी 50 गुण राहणार आहेत. वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा असून, स्पर्धा परीक्षेप्रमाणेच ती घेतली जाणार आहे. जिल्हा पातळीवरील परीक्षेत सामान्यज्ञानात जिल्ह्याचा भूगोल, इतिहास, हवामानासह वैशिष्ट्ये आदींबाबत प्रश्‍न विचारले जाणार आहेत. उत्तरपत्रिका काळ्या शाईचा बॉल पाँईट असलेल्या पेननेच सोडवाव्या लागणार आहेत. ज्या ठिकाणी शारीरिक चाचणी अथवा व्यावसायिक चाचणी घेणे बंधनकारक असेल, तर लेखी परीक्षा 120 गुणांची, तर व्यावसायिक, शारीरिक चाचणी 80 गुणांची घेतली जाणार आहे. 

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्य, ज्येष्ठांना सवलत

भरतीत समान गुण मिळाल्यास, त्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे (सरकारी मदतीसाठी पात्र ठरलेला आत्महत्याग्रस्त शेतकरी) पाल्य असल्यास त्याला प्रथम संधी दिली जाणार आहे. यानंतर वयाने ज्येष्ठ असलेल्याला संधी दिली जाणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता, अंतिम दिनांक आदी प्रचलित बाबींचा अवलंब केला जाणार आहे. 

परीक्षेसाठी पोर्टल; शुल्कही निश्‍चित

सर्व परीक्षा ‘महापरीक्षा’ पोर्टलद्वारे घेतल्या जाणार आहेत. परीक्षेसाठी शुल्क निश्‍चित करण्यात आले असून, सर्वसाधारण उमेदवाराला 300 रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला 150 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत चलनाद्वारे, ऑनलाईन अथवा नागरी सुविधा केंद्रात पावतीद्वारे भरता येणार आहे.