होमपेज › Kolhapur › शालिनी सिनेटोन पाडणार्‍या घुमरेंना नोटीस :­ आयुक्त

शालिनी सिनेटोन पाडणार्‍या घुमरेंना नोटीस :­ आयुक्त

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शालिनी सिनेटोनची वास्तू पाडल्याप्रकरणी वटमुखत्यार चांगदेव रामभाऊ घुमरे यांना, तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बुधवारी बजावली आहे. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी महासभेत ही माहिती दिली. नोटिसीला उत्तर न दिल्यास घुमरे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

आयुक्त म्हणाले, जागा महापालिकेच्या ताब्यात राहण्यासाठी सर्व पर्याय तपासून पाहिले जात आहेत. संबंधित जागा ऐतिहासिक वारसास्थळाच्या यादीत घालण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मूळ मालक मयत झाल्याने वटमुखत्यार संपुष्टात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान ते सांगितले असून आता राज्य शासनाकडे सुरू असलेल्या सुनावणीवेळीही ती माहिती दिली जाईल. आरक्षणाच्या फेरप्रस्तावाबाबत नगरसेवकांनी निवेदन दिले असले तरी कायदेशीर मत घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. वटमुखत्यारला फायदा होऊ नये, यासाठी घाईगडबडीने निर्णय घेणार नाही.
नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी शालिनी सिनेटोन परिसरातील ले-आऊटला 2001 मध्ये तात्पुरती मंजुरी दिली होती. त्यानंतर 2004 ला अटी व शर्तीवर ले-आऊट मंजूर झाला. 2009 ला शालिनी सिनेटोनचे शेड पाडल्याचे खोत यांनी म्हणताच नगरसेवक भूपाल शेटे यांनी त्यांना धारेवर धरले. अखेर खोत यांनी सारवासारव करत सिनेटोन असे शब्द वापरले. 2012 ला हेरिटेज यादीतून शालिनी सिनेटोन वगळल्यानंतर वटमुखत्यार घुमरे यांनी तीनवेळा विकास करण्याची परवानगी मागितली. परंतु, महापालिका प्रशासनाने परवानगी नाकारल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले.