Tue, Jul 16, 2019 10:17होमपेज › Kolhapur › एफआरपी न देणार्‍या कारखान्यांना नोटीस

एफआरपी न देणार्‍या कारखान्यांना नोटीस

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 12:42AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विभागातील ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही, अशा कारखान्यांना नोटीस देण्यात आल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी दिली. तत्पूर्वी, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एफआरपी न देणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच संबंधित कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाने रावळ यांची भेट घेऊन विभागातील ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. जिल्ह्यात 31 डिसेंबरअखेर 41 लाख 82 हजार मेट्रिक टन गाळप झाले आहे. अजूनही कारखान्यांकडून 335 कोटींची एफआरपी ऊस उत्पादक शेतकर्‍याला मिळालेली नाही. सध्या शेतकरी अनेक अडचणीत असला तरी केंद्र व राज्य सरकारला शेतकर्‍यांच्या समस्यांकडे पाहण्यास वेळ नाही. यापूर्वीही साखरेचे भाव घसरले असताना शेतकर्‍यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा झाली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही ही रक्कम जमा करण्याची मागणी करण्यात आली. 

जिल्ह्यातील आजरा, दत्त शिरोळ, पंचगंगा, शरद, डी. वाय. पाटील, दत्त दालमिया, गुरुदत्त टाकळी हे साखर कारखाने वगळता, इतर कारखान्यांनी  एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. तसेच ही जबाबदारी साखर सहसंचालक, ऑडिटर व साखर आयुक्त यांची असते; पण काही विभाग आणि अधिकारी साखर कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. यावर ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, त्यांना नोटीस काढण्यात आली असून सुनावणी सुरू असल्याचे रावळ यांनी निदर्शनास आणून दिले.

नोटीस दिलेल्यात इको केन, उदयसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला, केन अ‍ॅग्रो, महांकाली, निनाईदेवी, राजारामबापू कारखान्याची तीन युनिट यांचा समावेश आहे. महांकाली, केन अ‍ॅग्रो व माणगंगा कारखान्यांची मंगळवारी साखर आयुक्तांकडे सुनावणी असल्याचे सांगण्यात आले. शिष्टमंडळात सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, दुर्गेश लिंग्रस, राजू यादव, शिवाजीराव जाधव आदींचा समावेश होता.