Thu, Apr 25, 2019 06:23होमपेज › Kolhapur › ‘मराठा आरक्षणासंबंधीची सर्व माहिती दिल्याने चर्चेची गरज नाही’

‘मराठा आरक्षणासंबंधी आता चर्चेची गरज नाही’

Published On: Aug 01 2018 10:38PM | Last Updated: Aug 01 2018 10:38PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार नाही, अशी स्पष्टोक्ती कोल्हापूरमधील श्रीमंत शाहू छत्रपती आणि इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी केली आहे. मराठा समाजाने या अगोदर 58 मोर्चांतून निवेदने दिली असताना आता कसली चर्चा?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी डॉ. एन. डी. पाटील, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, शाहू महाराज, जयसिंगराव पवार यांना बोलावले होते. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शाहू महाराज आणि जयसिंगराव पवार यांनी ठिय्या आंदोलनस्थळी मुस्लिम बोर्डिंग येथे आंदोलकांची भेट घेतली. गेल्या चार वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यासंदर्भातील माहिती सरकारला पुरवलेली आहे, तरीही सरकार निर्णय घेत नाही. सरकार आरक्षणासंदर्भात चालढकल करत आहे. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिलेले असून, अशाच पद्धतीने महाराष्ट्रातही मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ब वर्ग) असा नवा प्रवर्ग करून त्यामध्ये आरक्षण द्यावे, त्यामुळे विद्यमान इतर मागासवर्गीय घटकांना फटका बसणार नाही आणि त्यांची नाराजीही येणार नाही. या आधारे अध्यादेश काढून सरकार मराठा आरक्षण देऊ शकते. आता याकरिता चर्चेला जाण्याची गरज नाही. असे मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, दिलीप पाटील, हर्षल सुर्वे, अवधूत कुंटे, सचिन तोडकर, गुलाबराव घोरपडे यांनी सुचवले. आंदोलकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर शाहू महाराज आणि जयसिंगराव पवार यांनी गुरुवारी मुंबईतील चर्चेसाठी जाणार नाही, असा निर्णय घेतला. 


चर्चेतून फलनिष्पत्ती होईल :  डॉ. प्रतापसिंह जाधव
शाहू महाराज यांनी या निर्णयाची माहिती डॉ. प्रतापसिंह जाधव यांना मोबाईलवरून स्पीकर ऑन करून दिली. डॉ. जाधव हे  मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला जाण्यासाठी पुण्याला रवाना झाले होते. शाहू महाराज यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला व आंदोलकांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. आपण बैठकीस जाऊ नये, अशी आंदोलकांची विनंती असल्याचे त्यांनी डॉ. जाधव यांना सांगितले. डॉ. जाधव यांनी, या बैठकीला जाऊन चर्चेतून काय तोडगा निघतो, ते पाहिले पाहिजे, असे सांगितले. आतापर्यंत जाट, गुर्जर, पटेल यांची आंदोलने मोठी झाली. परंतु, चर्चेची दारे खुली नसल्याने फलनिष्पत्ती झाली नाही. त्यामुळे चर्चेतून फलनिष्पत्ती होईल, अशी भूमिका डॉ. जाधव यांनी मांडली. परंतु, तरी शाहू महाराज यांनी स्वत: व आंदोलनकर्त्यांच्या वतीने डॉ. जाधव यांना आग्रह केला. त्यानंतर आंदोलकांच्या भावनांचा आदर करीत आपण पुण्यातच थांबू, असे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शाहू महाराज व आंदोलकांना सांगितले.