Fri, Mar 22, 2019 07:41होमपेज › Kolhapur › नो डॉल्बी; समाजकंटकांवर करडी नजर ठेवा : कमलाकर

नो डॉल्बी; समाजकंटकांवर करडी नजर ठेवा : कमलाकर

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 08 2018 12:32PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर परिक्षेत्रात यंदाही गणेशोत्सवात डॉल्बीचा दणदणाट होणार नाही, याची पोलिस दलासह समाजातील सर्वच घटकांनी खबरदारी घ्यावी. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा, असे आवाहन अप्पर पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर यांनी शुक्रवारी येथे बोलताना केले. समाजकंटकांच्या हालचालीवर करडी नजर ठेवून प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारा, असेही ते म्हणाले.

 गणेशोत्सव, मोहरम सणाच्या पार्श्‍वभूमीवर अप्पर पोलिस महासंचालक कमलाकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांची शुक्रवारी सकाळी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयात बैठक झाली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सांगलीचे सुहेल शर्मा, सातारा येथील पंकज देशमुख, पुणे ग्रामीणचे संदीप पाटील, सोलापूर ग्रामीणचे मनोज पाटील आदी उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्रात गतवर्षी डॉल्बीशिवाय गणेशोत्सव साजरा झाला. यंदाही ही परंपरा कायम ठेवून राज्यात आदर्श निर्माण करा, असे आवाहन करून कमलाकर म्हणाले, विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील आणि टीमने परिक्षेत्रांतर्गत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच गुन्हेगारीला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा गणेशोत्सवासह मोहरम सण एकाचवेळी साजरा होत आहे. कोणत्याही अनुचित घटनाशिवाय हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा जोपासण्याचा प्रयत्न करावा. कोल्हापूर जिल्ह्याला राजर्षी शाहूंच्या विचारधारेची परंपरा आहे, असेही ते म्हणाले.

 विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेत डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सवासाठी समाजातील सर्व घटकांना विश्‍वासात घेऊन अधिकारी, पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई गतीने सुरू आहे. संघटित टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी मोका, झोपडपट्टी दादाविरोधी प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

गणेशोत्सव, मोहरम परिक्षेत्रांतर्गत बंदोबस्त

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत गणेशोत्सव, मोहरमसाठी उपलब्ध फौजफाट्याशिवाय बाहेरहून मोठी कुमक पाचारण करण्यात येत आहे. त्यामध्ये पोलिस अधीक्षक 5, अप्पर पोलिस अधीक्षक 7, पोलिस उपअधीक्षक 38, पोलिस अधिकारी 342, पोलिस 9 हजार 600 याशिवाय अन्य जिल्ह्यातील अधिकारी 50, राज्य राखीव दलाच्या 10 तुकड्या, पोलिस 500, गृह रक्षक दलाचे जवान 5000 असा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे.

परिक्षेत्रातून 783 गुंडांवर तडीपारीची कारवाई

खबरदारीचा उपाय म्हणून गंभीर गुन्ह्याचे रेकॉर्ड असलेल्या परिक्षेत्रातील 783 गुन्हेगारांना तडीपार करण्यात येत आहे. त्यामध्ये कोल्हापूर (108), सांगली (76), सातारा (65), सोलापूर ग्रामीण (325), पुणे ग्रामीण (209) सराईतांचा समावेश आहे. दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या 16 हजार 600 सराईतांवर प्रतिबंध कारवाई करण्यात येत आहे.

307 ठिकाणी‘एक गाव, एक गणपती’

 कोल्हापूर परिक्षेत्रात 307 ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ची प्रतिष्ठापना होत आहे. पाचही जिल्ह्यातून 23 हजार 203 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘श्री’ प्रतिष्ठापणा होईल. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात 7 हजार 239 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे. अनंत चतुर्थीला 13 हजार 500 गणरायाचे विसर्जन होईल, असेही सांगण्यात आले.

अप्पर महासंचालक कमलाकर यांचा एस.टी.ने प्रवास
अप्पर पोलिस महासंचालकपदापर्यंत मजल मारलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी धनंजय कमलाकर यांचा साधेपणा पोलिस दलच नव्हे, सामान्यांतही कौतुक, चर्चेचा विषय ठरला आहे. परिक्षेत्रांतर्गत गणेशोत्सव, मोहरम बंदोबस्त नियोजनाच्या बैठकीसाठी अप्पर पोलिस महासंचालक खुद्द राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून सकाळी कोल्हापूर बसस्थानकावर उतरल्याने सार्‍यांच्या भुवया उंचावल्या.