Tue, Jul 23, 2019 06:14होमपेज › Kolhapur › धोका नाही, पण गाफील नको

धोका नाही, पण गाफील नको

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 11:06PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला कोणताही धोका नाही, पण स्थायी समिती सभापती निवडणुकीत विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडून दगाफटका झाल्याने कोणीही गाफील रहायला नको, असे आवाहन काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी केले. महापौरपद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नागाळा पार्कमधील एका हॉलमध्ये दुपारी सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन आलेल्या संयुक्‍त बैठकीत ते बोलत होते. 

आमदार पाटील म्हणाले, स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतील अनुभव पाहता विरोधकांकडून पुन्हा दगाफटका होण्याची शक्यता आहे. संघर्षाची वेळ असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकजुटीने रहावे. आमदार मुश्रीफ म्हणाले, महापौरपदासाठी होणारी ही निवडणूक ऐतिहासिक बनली आहे. स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत जो दगाफटका झाला त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. गाफील न राहता काँग्रेसचाच महापौर होण्यासाठी व्यूहरचना आखावी, अशी सूचनाही केली. बैठकीला उपमहापौर सुनील पाटील, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, सभागृह नेता दिलीप पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर आर. के. पोवार आदींसह इतर उपस्थित होते. 

नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

कोल्हापूर महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना मोबाईलद्वारे संपर्क साधूनच विरोधकांनी फोडले. त्यामुळे महापौर निवडणुकीतील नगरसेवकांना सहलीला जाताना मोबाईल घेऊन जाता येणार नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले. परिणामी सहलीवर गेलेल्या बहुतांश नगरसेवकांचे मोबाईल सायंकाळनंतर नॉट रिचेबल येत होते. 

प्रा. जयंत पाटील यांच्यासह सहा नगरसेवक गैरहजर

महापौरपदाच्या निवडीसंदर्भात बैठक असूनही त्याकडे राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांनी गैरहजर राहून पाठ फिरविली. प्रा. जयंत पाटील यांच्यासह मुरलीधर जाधव, सौ. अनुराधा खेडकर, महेश सावंत, अफजल पिरजादे, अजिंक्य चव्हाण आदींनी बैठकीला दांडी मारली. प्रा. पाटील, जाधव व सावंत हे परगावी असल्याने बैठकीला येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले, तर पिरजादे व चव्हाण यांच्याविषयी कुणीच खुलासा केला नाही; परंतु गैरहजर नगरसेवकांच्या नावावरून उपस्थित नगरसेवकांत चांगलीच चर्चा रंगली होती. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीवेळीही प्रा. पाटील हे कोणत्याच प्रक्रियेत सहभागी नव्हते. यंदाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ते गेल्या पंधरा दिवसांपासून सक्रिय आहेत; परंतु नेमके महत्त्वाच्या बैठकीला प्रा. पाटील गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चेला नव्याने उधाण आले आहे.