Sat, Jul 20, 2019 11:05होमपेज › Kolhapur › खांदेपालटाला अडीच वर्षासाठी पूर्णविरामखांदेपालटाला अडीच वर्षासाठी पूर्णविराम

खांदेपालटाला अडीच वर्षासाठी पूर्णविराम

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 12:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जनसुराज्यचे माजी आमदार विनय कोरे यांनी खांदेपालटासाठी नकार दिल्याने अखेर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाच्या चर्चेवरच अडीच वर्षासाठी पडदा पडला आहे. भाजप व जनसुराज्यच्या भूमिकेमुळे बदलासाठी आग्रही असलेल्या सदस्य व कारभारी नेत्यांचा मात्र हिरमोड झाला असून त्यांच्यात नेत्यांकडून फसवणूक झाल्याची भावना बळावली आहे. भविष्यात वचपा काढण्यासाठी जखम बांधून ठेवल्याची भावना हे सदस्य व्यक्‍त करू लागले आहेत. दरम्यान नाईलाजास्तव बदलासाठी तयार झालेल्या घटक पक्षातील नेतेही सुंठेवाचून खोकला गेल्याने समाधान व्यक्‍त करत आहेत. 

पदाधिकारी बदलासाठी सव्वा वर्षाचा नेत्यांचा शब्द प्रमाण मानून सत्ताधारी भाजप व घटक पक्षांतील इच्छुक सदस्यांनी खांदेपालटासाठी बैठकांचा रतीब सुरू केला होता. स्वत: खासदार राजू शेट्टी यांना पुढे करून बैठका झाल्या. पदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याने गेल्या महिनाभरापासून यावरून बरेच वातावरण तापले होते. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जनसुराज्यचे माजी आमदार विनय कोरे यांनी आपले पदाधिकारी बदल होणार नाहीत, घटक पक्षांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घ्यावा, असे सांगून बदलाच्या चर्चेला आपल्याकडूनच पूर्णविराम दिला. सत्ताधारी गटातील दोन मोठ्या पक्षांनी नकार दिल्याने अखेर शिवसेना, स्वाभिमानी यांनीही बदलास असमर्थता दर्शवली आहे. महापौर निवडीपर्यंत बदलाची चर्चा थांबवावी असे सांगितले जात असले तरी अडीच वर्षासाठी बदलाचे नाव काढू नये असेच पालकमंत्र्यांनी सुनावले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या सर्व घडामोडीवर पाणी फिरले असून घटक पक्षांतील सदस्यांना हातावर हात ठेवून बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

इतिहासाची पुनरावृत्ती

शौमिका महाडिक याच अडीच वर्षे अध्यक्ष राहणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्याने इतिहासाची नेहमीच पुनरावृत्ती होत असते हे जिल्हा परिषदेने यानिमित्ताने पुन्हा एकदा अनुभवले आहे. पदाधिकारी होण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला नेते निश्‍चित करतात, पण त्याचे पालन होताना दिसत नाही. 2012 मध्ये अमल महाडिक यांना वगळून प्रा. संजय मंडलिक यांना अध्यक्षपद दिले गेले. खांदेपालटासाठी बरेच प्रयत्न झाले पण तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अभयामुळे त्यांनी अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला. राजीनामा न दिल्याने खांदेपालटाचा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला मोडीत निघाला.  आता पाच वर्षानंतर पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. 

Tags : Kolhapur, No, change,  power, two,half, year, period