Sun, Jul 21, 2019 10:04होमपेज › Kolhapur › ‘नो फी नो डोनेशन’

‘नो फी नो डोनेशन’

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 1:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘गुढी पाडवा प्रवेश वाढवा’ हे घोषवाक्य घेऊन पहिली प्रवेशासाठी यशस्वीपणे मोहीम राबवल्यानंतर आता अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियान जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून प्राारंभ झालेली ही मोहीम 20 मार्चपर्यंत चालणार आहे. 31 मे 2018 रोजी 3 वर्षे पूर्ण करणार्‍या बालकांना अंगणवाडीत प्रवेश दिला जाणार आहे. 

जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात सध्या 3 हजार 994 अंगणवाड्यांतून 1 लाख बालके शिक्षण घेत आहेत. तथापि, ही प्रवेश संख्या खूपच अपुरी आहे. प्रवेश कमी झाल्यास अंगणवाड्या बंद करून त्याचे स्थानांतरण करण्याचे सरकारचे धोरण असल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नर्सरी, प्ले स्कूल, प्री-प्रायमरी, ज्युनिअर, सिनिअर केजी अशा खासगी शाळांचे जिल्हाभर पेव फुटले आहे. या खासगी शाळांच्या अत्याधुनिक सुविधा पाहून पालकांचा या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल आहे. भरमसाठ फी देऊन पालक प्रवेश निश्‍चित करतात. 

याउलट अंगणवाड्यांची भौतिक सुविधा अपुरी असली तरी गुणवत्तेच्या बाबतीत अंगणवाड्यांतील शिक्षण सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळांना मागे टाकणारे आहे. हे वारंवार सिद्ध झाले आहे; पण हे पटवून देण्यात शासकीय यंत्रणा कमी पडते. त्यामुळेच आता महिला बालकल्याण विभागाने अंगणवाडी शिक्षणाचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडीतील शिक्षण आणि बाहेरील खासगी संस्थांतील शिक्षणाचा तुलनात्मक अहवाल तयार करण्यात आला आहे. बुकलेटच्या स्वरूपात गावागावांत त्याचे सादरीकरण करून ‘नो फी नो डोनेशन ओन्ली रिअल एज्युकेशन’ या भूमिकेतून अंगणवाडीतील प्रवेश वाढवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

अंगणवाडीत हे मिळते
अंगणवाडीत मुलांना रोज पोषण आहार, पूरक पोषण आणि प्रथिनयुक्त आहार दिला जातो. याशिवाय आरोग्य तपासणीसह उपचाराचीही सोय असते. कमी वजनाच्या बालकांसाठी अतिरिक्त आहाराचीही सोय आहे. शिवाय हसत- खेळत शिक्षण या संकल्पनेतून आकार सारखा राज्यपातळीवर आदर्श ठरलेला अभ्यासक्रम शिकवला जातो.