Fri, Dec 13, 2019 19:18होमपेज › Kolhapur › नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे निर्वाण

नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे निर्वाण

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:49AM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

कोल्हापूर, नांदणी, तेरदाळ, बेळगाव या संस्थान मठाचे प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी (वय 84) यांचे गुरुवारी सायंकाळी समाधीपूर्वक निधन झाले. नांदणी येथील वृषभाचल निशिदिकेवर महास्वामी चक्‍कर येऊन पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचे निर्वाण झाले. त्यानंतर नांदणी येथे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. मठसंस्थान अधिपत्याखालील उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातील 740 गावांत शोकाकुल वातावरण पसरले. शुक्रवारी सकाळी आडकेवाडी मार्गावरील शेतात दहनविधी होईल.

घटनेनंतर महास्वामींना जयसिंगपूर येथील पायोस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निर्वाण झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. ही माहिती समजताच रूग्णालय परिसरात जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवारी सकाळी नांदणी येथे जिनसेन मठसंस्थानमध्ये धार्मिक पूजाविधी झाल्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर आडकेवाडी मार्गावरील शेतात दहनविधी होईल अशी माहिती येथे रात्री जैन समाजाच्यावतीने पत्रकार बैठकीत देण्यात आली. यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, उद्योगपती आण्णासाहेब चकोते, दक्षिण भारत जैन समाजाचे महामंत्री सागर चौगुले, जयसिंगपूर पार्श्‍वनाथ दिगंबर जैन मंदिराचे ट्रस्टी दादा पाटील-चिंचवाडकर, आप्पासाहेब लठ्ठे, संजय बोरगावे, राजू कुरडे व सागर पाटील उपस्थित होते.

शुक्रवारच्या धार्मिक पूजेला कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कर्नाटकातील हुमचा येथील देवेंद्रकिर्ती भट्टारक महास्वामी, दिल्ली जवळील तिजारा (राजस्थान) येथील सौरभसेन भट्टारक महास्वामी तसेच लक्कवळी (हुबळी) येथील वृषभसेन भट्टारक महास्वामी यांची उपस्थिती राहणार आहे.

महास्वामींचे जीवनकार्य  

कोल्हापूर, नांदणी, तेरदाळ, बेळगाव या संस्थान मठाचे प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी हे या चार मठाचे 1991 पासून मठाधिपती होते. मठाच्या अधिपत्याखालील 740 गावात जैन समाजाचे रक्षण करणे, पंचकल्याण पूज्या, विधी-विधान, मंदिर निर्माण, जिर्णोध्दार, मूर्ती प्रतिष्ठापणा आदि कार्ये त्यांच्या अधिपत्याखाली होत असत. महास्वामींचे मंदिर निर्माण कार्यात वैशिष्ट होते. मंदिराची रचना, गाभारा, मूर्ती कशी असावी यात ते निष्णांत होते. 

महास्वामींचे मुळगाव निमशिरगांव (ता.शिरोळ) होते. ते सदलगा येथे दत्तक गेले होते. वयाच्या 14 व्या वर्षापासून त्यांना धार्मिक वृत्तीची ओढ लागली. त्यांनी आचार्य देशभूषण महाराजाकडून क्षुल्लक दिक्षा घेतली. त्यांची प.पू.105 चंद्रभूषण महाराज अशी ओळख होती. बरीच वर्षे त्यांनी मुनीसंघातून देशभरात विहार केला. एलाचार्य विद्यानंद महास्वामींचे त्यांना सान्निध्य लाभले. 

विशेष म्हणजे दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात त्यांचा सुबलसागर महाराजांच्या मुनीसंघात विहार असायचा. संस्थान मठाचे यापूर्वीच्या महास्वामींचे सन 1991 ला निर्वाण झाल्यानंतर ते मठाधिपती बनले. तेव्हापासून नांदणी मठसंस्थानमधून त्यांचे धार्मिक कार्य सुरू होते.