होमपेज › Kolhapur › निपाणी-दाजीपूर 70 कि.मी. रस्त्यासाठी २०४ कोटींची निविदा

निपाणी-दाजीपूर 70 कि.मी. रस्त्यासाठी २०४ कोटींची निविदा

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 12:59AMहमीदवाडा : मधुकर भोसले

कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा व तळकोकणाशी थेट संपर्काच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या निपाणी-दाजीपूर या 178 क्रमांकाच्या राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणासह कामाची सुरुवात लवकरच सुरू होण्याची लक्षणे आहेत. याबाबत 204 कोटींची निविदादेखील प्रसिद्ध झाली आहे. देवगड जिल्ह्याच्या सीमेपासून निपाणीनजीक महाराष्ट्र हद्दीत लिंगनूरपर्यंतच्या 70 कि.मी.साठी मजबूत आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम गृहीत धरून वर्षापूर्वीच बाजूची बरीच अतिक्रमणे बांधकाम विभागाने दूर केली आहेत. 

कर्नाटकातील मुधोळ ते निपाणी या राज्य महामार्गाचे दर्जेदार काम लिंगनूरनजीक महाराष्ट्र हद्दीला येऊन पूर्ण झाले आहे. कर्नाटकचे हे काम अत्यंत दर्जेदार आहे. निपाणी ते लिंगनूर या अवघ्या पाच कि.मी. अंतरामध्ये असलेला रस्तादेखील राष्ट्रीय महामार्गाला लाजवेल असा दर्जेदार आहे. लिंगनूरपासून पुढे महाराष्ट्र हद्द सुरू होते व हाच रस्ता मुरगूड-मुदाळतिट्टा-राधानगरी-दाजीपूर-फोंडा घाट असा कोकणात जातो. दोन राज्ये जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून, कर्नाटकातून मुधोळ-अथणी-रायबाग-चिकोडी-निपाणी अशा विभागातून कोकणाशी संपर्कासाठी हा प्रमुख रस्ता आहे.

10 ते 12 साखर कारखान्यांची ऊस वाहतूक, वडाप, एस.टी. वाहतूक, तसेच काळम्मावाडी, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य यांच्याशी संबंधित पर्यटकांची वर्दळ, तीर्थक्षेत्र आदमापूर अशा सर्वच दृष्टीने या रस्त्याचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी साधारण सव्वा वर्षापूर्वी या रस्त्याच्या मंजुरीबाबत व भरीव निधीबाबत घोषणा केली होती. टेंडरमुळे आता ही प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. या रस्त्याचे दहा मीटर रुंदीने डांबरीकरण केले जाणार आहे. राज्य महामार्ग 178 मधील 66 ते 136 कि.मी.दरम्यानचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, आदमापूर येथील उड्डाणपुलाचे काम स्वतंत्र मंजुरी व निधीतून अगोदरच सुरू झाले आहे.