Sat, Aug 24, 2019 12:20होमपेज › Kolhapur › एप्रिलमध्ये नाईट लँडिंग

एप्रिलमध्ये नाईट लँडिंग

Published On: Feb 12 2019 1:25AM | Last Updated: Feb 12 2019 1:25AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूर विमानतळावर दोन महिन्यांत म्हणजे एप्रिल महिन्यात ‘नाईट लँडिंग’ची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याद‍ृष्टीने विमानतळ प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने हालचाली गतिमान केल्या आहेत. 31 मार्चपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे एप्रिलपासून रात्रीही विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग होणे शक्य होणार आहे.

कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी 2 फेब्रुवारीला कोल्हापुरात केली होती. यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने नाईट लँडिंग सुविधेचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही क्षणी त्याला मंजुरी मिळेल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली. या बैठकीत 31 मार्चपर्यंत नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजनबद्ध काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाईट लँडिंगसाठी विमानतळ परिसरात 30 ते 40 ठिकाणी ‘ऑप्टिकल बल्ब’ लावण्यात येणार आहेत. त्याचा सर्व्हे विद्युत विभागाने चार दिवसांपूर्वी केला आहे, त्यानुसार हे दिवे लावण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या दिव्यांसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येणार आहे. 

सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला लावण्यात येणारे दिवे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने बसविण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. धावपट्टीवरील दिवे आणि ‘ऑप्टिकल बल्ब’ यांना महावितरणकडून वीजपुरवठा केला जाणार आहे. काही दिवसांत आराखड्याला मंजुरी मिळेल, त्यानंतर वर्कऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाईल, हे सर्व काम 31 मार्चअखेर पूर्ण केले जाईल, असे विमानतळ प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगचे काम मार्चअखेर पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. यावेळी आ. अमल महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीर प्रांत सचिन इथापे, विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांच्यासह विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते.