Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Kolhapur › एकोंडीत नवविवाहितेची आत्महत्या

एकोंडीत नवविवाहितेची आत्महत्या

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 1:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

 एकोंडी (ता. कागल) येथील राजश्री राहुल खोंद्रे (वय 20) या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास लावून शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. संतप्त नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने येथील शासकीय रुग्णालय काही काळ तणाव झाला होता. याप्रकरणी सासू, सासर्‍यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरा जयसिंग निवृत्ती खोंद्रे, सासू मंगल आनंदा खोंद्रे (रा.एकोंडी), नणंद विजय सुभाष वाडकर (रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) अशी संशयितांची नावे आहेत. कागल पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयासह एकोंडीत पोलिसांचा बंदोबस्त पाचारण केला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

 पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, भारतीय सैन्य दलातील जवान राहुल यांच्याशी मौजे सांगाव (ता. कागल) येथील जयसिंग पाटील यांची कन्या राजश्रीचा 2016 मध्ये विवाह झाला. दाम्पत्याला सात महिन्यांचा राजवर्धन हा मुलगा आहे. महिन्याच्या सुट्टीवर आलेला राहुल तीन आठवड्यांपूर्वीच जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर हजर झाला आहे.

शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला सासू, सासरे हे वैरणीसाठी शेतात गेले होते. नेमके याच सुमाराला बाळाला बेडवर झोपवून राजश्रीने पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर सासरे घराकडे परतले. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

सीपीआरसह एकोंडीत मोठा पोलिस बंदोबस्त
 खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय रुग्णालयासह एकोंडीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजश्रीचे वडील जयसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. रात्री उशिरा एकोंडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सासू, सासरे व नणंद यांच्याकडून होणार्‍या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून राजश्रीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.