Mon, Aug 19, 2019 15:16होमपेज › Kolhapur › उसाचे नवे वाण; पन्हाळा-शाहूवाडीत काजू लागवड

उसाचे नवे वाण; पन्हाळा-शाहूवाडीत काजू लागवड

Published On: May 16 2019 2:05AM | Last Updated: May 16 2019 1:46AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

जिल्ह्यात 9057 हे उसाचे नवे वाण प्रसारित केले जाणार आहे. यासह गगनबावडा, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांत काजू लागवडीचा प्रस्ताव जिल्ह्याच्या कृषी आराखड्यात देण्यात आला आहे. पाच वर्षांचा जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यात संशोधनावर अधिक भर देण्यात आला आहे.

राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्याचा पाच वर्षांचा ‘यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा’ (एसआरईपी) तयार केला जात आहे. या आराखड्याची भविष्यात पाच वर्षे अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्याचा कृषी क्षेत्राचा विकास नियोजनबद्ध व्हावा, शेतकर्‍यांसाठी तो अधिक लाभदायी ठरावा, या हेतूने कृषी उत्पन्‍नवाढीसाठी करण्यात येणार्‍या विविध उपाययोजना, सरकारी, खासगी, भागीदारी तत्त्वावरील मदत, यांत्रिकीकरण, संशोधन आदींचा या आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.

प्रमुख चार घटकांवर हा आराखडा तयार करण्यात येणार आहे. चालू पीक पद्धती, जिल्ह्यातील हवामान, जमीन, पाणी, पाण्याचा स्रोत आदींद्वारे पिकांची गुणवत्ता, त्यातील त्रुटी आदी पिकांबाबत पहिल्या घटकांत आराखड्यात माहिती, आकडेवारी, भाष्य आदींचा समावेश असेल. एकात्मिक कीड व्यवस्थापन, अन्‍नद्रव्य व्यवस्थापन, बियाणे बदलाचे प्रमाण, खासगी, सहकारी, शासकीय, वैयक्‍तिक भागीदारी, सीएसआर निधीतून कृषी विकासासाठी वापर आदींचा दुसर्‍या घटकांत समावेश असेल. 

यांत्रिकीकरण हा तिसरा घटक आराखड्यात राहील. जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाला किती आणि कशी संधी आहे, कृषी क्षेत्रातील आवश्यक मनुष्यबळ किती प्रमाणात उपलब्ध आहे. नवे तंत्रज्ञान, त्याचे प्रशिक्षण आदींचा समावेश आराखड्यातील या तिसर्‍या घटकांत असेल. संशोधन हा आराखड्यातील चौथा घटक राहणार असून, जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील नवे संशोधन कसे करता येईल, नव्या संशोधनाचा वापर कसा करता येईल, त्यातून उत्पादकता कशी वाढवली जाईल, याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी सलग 72 दिवस पाऊस झाला होता. या कालावधीत अनेकदा धुक्याचेही प्रमाण अधिक होते. अशा वातावरणात चांगले उत्पादन देणार्‍या उसाच्या वाणाचा शोध सुरू होता. अशा वातावरणालाही अनुकूल ठरेल असे 9057 हे उसाचे नवे वाण पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसित केले आहे. या वाणाचा जिल्ह्यात प्रसार केला जाणार आहे. काही क्षेत्रांवर यावर्षी या वाणाची लागवड करण्यात येणार आहे. त्याचे परिणाम चांगले आले, तर भविष्यात त्याचे क्षेत्र वाढवले जाणार आहे. या वाणाचा कृषी आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. 

कोकणातला काजू विदर्भ-मराठवड्यात गेला आहे. विदर्भ-मराठवाड्यातील माळरानावर काजूची लागवड करण्यात येत आहे. याच धर्तीवर जिल्ह्याच्या चार तालुक्यांतच प्रामुख्याने होणार्‍या काजूची लागवड अन्य तालुक्यांत करण्याबाबत या आराखड्यात शिफारस करण्यात आली आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत अनेक ठिकाणी लाल माती आहे, अशा ठिकाणी काजूची लागवड करण्यात येणार आहे.

सहा महिन्यांत आराखड्याचे काम पूर्ण होईल
पाच वर्षांचा जिल्ह्याच्या कृषी विकासाचा हा आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यात समाविष्ट बाबींवर पुढील पाच वर्षे काम केले जाणार आहे. साधारणत: एक-दीड वर्षे आराखडा तयार करण्यासाठी वेळ लागणार होता. मात्र, नियोजित काम सुरू असल्याने येत्या सहा महिन्यांत या आराखड्याचे काम पूर्ण होईल. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी झाली, तर जिल्ह्याच्या कृषी विकासाला, उत्पादनवाढीवर सकारात्मक परिणाम होतील.

- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर