Tue, Apr 23, 2019 20:22होमपेज › Kolhapur › दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचे नवीन ‘टेक्निक’!

दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचे नवीन ‘टेक्निक’!

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:46PMकोल्हापूर : सुनील कदम

आता चोरांना किंवा दरोडेखोरांना चोरी करण्यासाठी रात्री-अपरात्री तुमच्या घरात शिरण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तुम्ही वारीत असलेले एटीएम, डेबिट किंवा के्रडिट कार्ड वापरून दिवसाढवळ्या तुमचे लाखो आणि कोट्यवधी रूपये लंपास करण्याचे नवीन ‘टेक्निक’ सायबर गुन्हेगारांनी केव्हाच आत्मसात केले आहे. त्यामुळे या कार्डांच्या वापरकर्त्यांनी या बाबतीत डोळ्यात तेल घालून सावधानता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

आपली मालमत्ता, रोकड किंवा दागदागिने सुरक्षित ठेवण्याचे सर्वात सुरक्षीत ठिकाण म्हणून वर्षानुवर्षे लोक बँकांचा वापर करतायत. मात्र, सायबर गुन्हेगारीच्या कचाट्यातून बँका सुटलेल्या नाहीत. उलट सायबर क्राईममुळे आजकाल बँकाच अधिक असुरक्षीत वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.  आजकाल बँकींगचे किंवा खरेदी-विक्रीचे जवळपास 80 टक्के व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीने होताना दिसतात. त्यासाठी प्रामुख्याने बँकेच्या एटीएम, क्रेडीट आणि डेबीट कार्डांचा वापर, याशिवाय मोबाईल बँकिंग प्रणालीचा वापरही संबंधितांकडून होतो. मात्र, या व्यवहारांमध्ये सायबर क्राईमचे प्रमाणही दरवर्षी वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार हे आपल्याच किंवा कोणत्या तरी ठराविक देशातील, भागातील असतील, अशातलाही भाग नाही. जगाच्या पाठीवर कुठेही बसून, जगाच्या पाठीवरील कोणत्याही व्यक्तीला ऑनलाईन गंडा घालण्याचे टेक्निक सायबर गुन्हगारांनी चांगलेच विकसित केल्याचे आढळून येत आहे.

यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. बँकेतून बोलत असल्याचा फोन करून तुमच्या कार्डचा नंबर, पासवर्ड वगैरे माहिती काढून घ्यायची आणि बनावट कार्डचा व पासवर्डचा वापर करून तुमच्या खात्यातील रकमेचा सफाया करायचा ही एक पध्दत. दुसरी पध्दत म्हणजे तुमच्या कार्डचे ‘क्लोनिंग’ (डुप्लिकेट) करून त्या माध्यमातून व्यवहार करणे. ऑनलाईन व्यवहारांच्या बाबतीत वापरकर्त्याच्या संगणक प्रणालीमध्ये घुसून संबंधितांच्या खात्यावरील रक्कम दुसर्‍या खात्यावर वर्ग करणे ही पध्दतसुध्दा सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतात. गेल्या काही वर्षात अशा प्रकारचे हजारो आर्थिक गुन्हे घडले असून त्यामध्ये संबंधितांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत.पारंपरिक पध्दतीच्या आर्थिक लुटीच्या घटना घडताना अनेकदा संबंधित व्यक्ती सावध होऊ शकते, त्यामुळे संभाव्य लूट काहीवेळा टाळता येवू शकते. मात्र, सायबर गुन्हेगारीच्या बाबतीत अशा घटना घडून गेल्यावरच संबंधितांना किंवा बँकांना त्याचा थांगपत्ता लागतो. अशा घटना घडण्यापूर्वीच संबंधितांना त्याबाबत सावध करणारे कोणतेही तंत्रज्ञान अजून तरी विकसीत झालेले नाही. सायबर गुन्हेगारीचे स्वरूप विचारात घेवून बँकांनी किंवा तशा स्वरूपाचे व्यवहार करणार्‍या संबंधित संस्थांनी तसे सुरक्षा विषयक तंत्रज्ञान विकसीत करावे, ही ग्राहकांची अपेक्षा आहे. मात्र जोपर्यंत अशा स्वरूपाचे एखादे तंत्रज्ञान वापरात येत नाही, तोपर्यंत या बाबतीत सर्वच संबंधितांना स्वत:च काळजी घेण्याशिवाय कोणताही पर्याय सध्यातरी दिसत नाही.