Sun, Apr 21, 2019 13:45होमपेज › Kolhapur › नवजात बालक दोन लाखांना; रॅकेटचा पर्दाफाश

नवजात बालक दोन लाखांना; रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Feb 07 2018 1:56AM | Last Updated: Feb 07 2018 1:56AMइचलकरंजी : प्रतिनिधी

जवाहरनगरमधील डॉ. अरुण पाटील यांच्या दवाखान्यावर मंगळवारी केंद्रीय पथकाने छापा टाकून नवजात बालकांची विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश केला. छत्तीसगड आणि मुंबई येथे दोन बालकांची लाखो रुपयांना विक्री केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. गर्भवती कुमारी माता आणि विधवांच्या असहाय्यतेचा फायदा घेत बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालकांची विक्री करण्याच्या या लाजीरवाण्या आणि धक्‍कादायक प्रकारामुळे इचलकरंजीत मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, डॉ. अरुण भूपाल पाटील, सौ. उज्ज्वला अरुण पाटील यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार 370, 317, 176, 34 सह बालन्याय अधिनियम 2015 च्या सुधारित कलम 75, 80 व 81 नुसार गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी इस्पितळातील महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. या घटनेमुळे इचलकरंजीचे वैद्यकीय क्षेत्र पुरते हादरून गेले आहे. यापूर्वी अनेक बालकांची विक्री झाल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांचा तपास सुरू असून, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जवाहरनगर येथे डॉ. अरुण पाटील यांचे जनरल सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. समाजसेवेच्या नावाखाली या ठिकाणी बेकायदेशीररीत्या कुमारी माता व विधवांची प्रसूती केली जात असल्याची व नवजात बालकांना गरजूंना लाखो रुपयांत विकले जात असल्याची तक्रार दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाला प्राप्‍त झाली होती. त्यानुसार केंद्रीय पथकाने गेल्या दोन महिन्यांपासून या दवाखान्यातील हालचालींवर पाळत ठेवली होती. दरम्यान, पथकाकडे काही दिवसांपूर्वीच कुमारी मातेचे नवजात बालक छत्तीसगड येथील दाम्पत्याला देत असल्याचे फोटो मिळाले होते. त्यानुसार आज नवी दिल्लीतील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे चेअरमन रामचंद्र रेड्डी, शिवानंद डंबल, श्रीणूजी, बालकल्याण समिती अध्यक्षा सौ. प्रियदर्शनी चोरगे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रमिला जरग, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते यांच्या पथकाने सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास डॉ. पाटील यांच्या दवाखान्यावर छापा टाकला.

पथकाने डॉ. पाटील यांच्याकडे दवाखान्याच्या कामकाजाबाबत चौकशी केली. त्यावेळी पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून आपण गरजूंना मदत करून त्यांचा औषधोपचार मोफत करत असल्याचे सांगितले. शिवाय, त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही करत असल्याचे सांगितले. वास्तविक, डॉ. पाटील आरएमपी असल्यामुळे त्यांना प्रसूती करण्याचा अधिकार नाही. डॉ. एस. एम. कोडोलीकर यांच्या मदतीने डॉ. पाटील प्रसूतीपूर्व गर्भ तपासणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. वास्तविक, त्यासाठी रेडिऑलॉजिस्टची आवश्यकता असते. मात्र, कायदेशीर पदवी नसतानाही डॉ. पाटील यांनी हा उद्योग सुरू केल्याचे पथकाच्या लक्षात आले. दरम्यान, त्यांनी कुमारी मातेची चौकशी केली असता आणखी काही धक्‍कादायक माहिती समोर आली. जत परिसरातील एक कुमारी माता गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टरांच्या घरीच वास्तव्यास असल्याचे समोर आले. प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बालिकेला एका दाम्पत्याला दिल्यानंतर आपल्याला 2 लाख रुपये मिळाल्याची कबुली या कुमारी मातेने दिली. विशेष म्हणजे, ही कुमारी माता अल्पवयीन असून, जवाहरनगर परिसरातील तिच्या नातेवाइकांकडे सुरुवातीचे काही दिवस राहत असल्याची, तसेच प्रसूती नजीक आल्यानंतर डॉक्टरांच्या घरीच राहत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे या प्रकरणाच्या गांभीर्याची व्याप्‍ती पथकाच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी डॉ. पाटील यांच्याकडे रेकॉर्डची मागणी केली. मात्र, डॉ. पाटील यांनी सी.ए.कडे रेकॉर्ड दिल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, मुले नसणार्‍या दाम्पत्यांची यादी डॉक्टरांकडे आहे. नवजात मुलगी किंवा मुलासाठी डॉ. पाटील यांच्याशी अशी दाम्पत्ये संपर्क साधत असून, त्यानुसार मुलांची विक्री करण्याचा उद्योगच येथे चालत असल्याचा दावा पथकाने केला. 

केंद्रीय पथकाने छापा टाकताना पोलिसांनाही त्याची माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी डॉ. अरुण पाटील, डॉ. एस. एम. कोडोलीकर, डॉ. पाटील यांची पत्नी सौ.उज्ज्वला पाटील, कुमारी माता यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. शिवाय, दवाखान्यातील रेकॉर्डही ताब्यात घेण्यात आले. छापा टाकल्यानंतर डॉ.पाटील यांच्याशी कोणीही संपर्क करू नये, यासाठी त्यांचा मोबाईलही ताब्यात घेण्यात आला होता. दरम्यान, डॉ. पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आणि राजकीय नेत्यांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. या धक्‍कादायक प्रकारामुळे शहर आणि वैद्यकीय क्षेत्र बदनाम झाल्याच्या संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत.