Sat, Jan 19, 2019 09:36होमपेज › Kolhapur › न्यूट्रियन्स-जिल्हा बँक तडजोड फिसकटली

न्यूट्रियन्स-जिल्हा बँक तडजोड फिसकटली

Published On: Aug 25 2018 1:14AM | Last Updated: Aug 25 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना भाड्याने घेतलेल्या न्यूट्रियन्स कंपनी व जिल्हा बँकेत सुरू असलेल्या वादात कारखाना संचालकांनी नकारात्मक भूमिका घेतल्याने सेवा व विधी प्राधिकरणासमोर सुरू असलेली तडजोड शुक्रवारी फिसकटली. या घडामोडीमुळे या हंगामात कारखाना सुरू होण्याच्या आशा अंधुक झाल्या आहेत.
दरम्यान, कर्मचारी पगार, शेतकर्‍यांची देणी न दिलेल्या कंपनीला कारखाना द्यायचा नाही, अशी आक्रमक भूमिका कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांच्यासह संचालकांनी घेतली. त्यामुळे प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे यांनी हे प्रकरण पुन्हा जिल्हा न्यायाधीशांकडे पाठवले होते.

न्यायमूर्ती मोरे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी सूचना केली. या चर्चेत कारखान्याचे माजी अध्यक्ष पाटील व संचालक यांनी हस्तक्षेप करून तडजोडीचा प्रस्ताव नाकारला. चर्चेतून तोडगा निघत नाही, असे लक्षात आल्यानंतर न्या. मोरे यांनी हे प्रकरण पुन्हा प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडे पाठवले. या दाव्यात संचालक व कामगारांनी प्रतिवादी करून घेण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान बँकेच्या वतीने अ‍ॅड. लुईस शहा, कंपनीच्या वतीने अ‍ॅड. अभिजित कापसे तर संचालकांच्या वतीने अ‍ॅड. वाघ यांनी काम पाहिले.