Tue, Mar 19, 2019 16:02होमपेज › Kolhapur › पारंपरिक चौकटीतून बाहेर पडा...

पारंपरिक चौकटीतून बाहेर पडा...

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

परंपरा, संस्कृतीच्या चौकटीतून बाहेर पडा, हळदी-कुंकू, ओटी भरण्याच्या पलीकडे मोठे सौभाग्याचे आयुष्य आहे. गरुडासारखी झेप घ्या, स्वत:चे अस्तित्व, ओळख निर्माण करा, कुणी संरक्षणाला येईल याची वाट पाहत बसू नका, स्वत:च स्वत:चे संरक्षण करण्याइतपत शारीरिक मानसिक ताकद स्वत:त निर्माण करा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार, बेटी पढाओ, महिला सुरक्षा कायदा मार्गदर्शिका निर्माती लेखिका नीलिमा तपस्वी यांनी केले. 

जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्ह्यातील 48 अंगणवाडी सेविकांना पुरस्काराने गौरवण्यात आले. किशोरवयीन मुलींसाठीच्या अस्मिता योजनेसह अंगणवाडी प्रवेशाचा प्रारंभही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक, सीईओ डॉ. कुणाल खेमनार, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, महिला बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, प्रकल्प संचालक हरिष जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिजाऊ, ताराराणी, झाशीची राणी, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे कौतुक करून त्याप्रमाणेच महिलांची वाटचाल राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत महिलांना खडे बोलही सुनावले. पारंपरिक चौकटी भेदायला शिका, असे सांगताना गरुडाचे उदाहरण देत त्याप्रमाणे उंच आभाळात स्वतंत्रपणे विहरायला शिका, असे आवाहन केले. अवकाशाला गवसणी घालताना सुरक्षेचा काळिमा लागल्याची खंत बोलून दाखवताना कितीही कायदे आले तरी महिलांची परिस्थिती बदललेली नाही. कायद्याचाच जाच जास्त होऊ लागला असून जाचाऐवजी धाक निर्माण व्हावा, यासाठी महिलांनी स्वत:च किमान दहा कायदे तरी तोेंडपाठ करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

अध्यक्षपदावरून बोलताना शौमिका महाडिक यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याचा पट उलगडला. आई, वडील, बहिणी, जावा, सासू यांच्या सहकार्यामुळेच आज तुमच्यासमोर उभी राहिली आहे. वडील तर कायमच गुरुस्थानी राहिले. जहागिरदार घरात जन्माला येऊन सर्वसामान्य मुलींसारखे वाढवले, सर्व कामे करायला लावले. कधी गाडी घेऊन दिली नाही, अशा आठवणी सांगितल्या. यातून संस्कार चांगले झाले. याचप्रमाणे महिलांनी मुलांच्या आयुष्यात मार्गदर्शक बनून रहावे, असे सांगितले.