Tue, Jul 23, 2019 11:06होमपेज › Kolhapur › अभ्यास करून चित्रपट निर्मिती आवश्यक : राजदत्त

अभ्यास करून चित्रपट निर्मिती आवश्यक : राजदत्त

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:31AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

केवळ चित्रपट निर्माण करायचा म्हणून कोणी करू नये, तर त्याचा अभ्यास करून समाजापर्यंत तो पोहोचवण्यासाठी दिग्दर्शकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले. कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित ‘बदलता मराठी चित्रपट’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. 

राजदत्त म्हणाले, दर दहा वर्षांनंतर पिढी बदलते, या पिढीला चित्रपटातील बदलत्या तंत्राची माहिती होणे आवश्यक आहे. चित्रपट समाजातील  बदलाची माहिती देत असतो. नवनवीन विषय चित्रपटांमध्ये येत असून,  दिग्दर्शकांनी कथेचा अभ्यास करावा व कथेतून काय सांगायचे आहे, हे समजून घेऊन अभ्यास व चिंतन करून चित्रपट तयार करावा.

संतोष पठारे म्हणाले, मराठी सिनेमाचा आशय हा गाभा आहे. आज आशयघन चित्रपटांना प्रेक्षकांची दाद मिळते, केवळ चित्रपटांची संख्या वाढवून उपयोग नाही, तर दर्जेदार चित्रपट तयार करावेत. सुबोध गुरुजी म्हणाले, पूर्वी कथेनुसार सिनेमात दृश्यांची मांडणी केली जात होती. 

आज बाह्य चित्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे कला दिग्दर्शक बाजूला पडत आहेत. सतीश रणदिवे म्हणाले, आजचा सिनेमा सशक्त झाला आहे. ‘श्‍वास’ चित्रपटामुळे मराठी चित्रपटाला ऊर्जा मिळाली. प्रेक्षकांनी आता सोशल मीडियावर चित्रपट न पाहता चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहावा. सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत जोशी यांनी मानले. आज दुपारी ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेता अमोल पालेकर यांचा ‘थांग’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.