Tue, Nov 13, 2018 11:02होमपेज › Kolhapur › नक्षलवाद रोखण्यासाठी प्रबोधन गरजेचे : पाटील

नक्षलवाद रोखण्यासाठी प्रबोधन गरजेचे : पाटील

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 12:48AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

लोकशाही मान्य नसणारा गट आदिवासी भागातील लोकांना नक्षलवादी बनण्यासाठी प्रवृत्त करतो, अशा लोकांचे प्रबोधन केल्यास नक्षलवाद संपुष्टात येऊ शकतो, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी केले. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम व श्री महालक्ष्मी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने  तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत ‘नक्षलवाद एक आव्हान’ या विषयावर ते बोलत होते.

पाटील म्हणाले, मी नक्षलवादी भागात काही वर्षे काम केले आहे.   अन्यायाविरोधात लढणारे, गरिबांना मदत करणारे नक्षलवादी, असा काहीसा समज आहे; पण तो चुकीचा आहे. महाराष्ट्रात नक्षलवादी भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्याकडे पाहिले जाते. जमीनदारांचा एक वर्ग आहे, तो या परिसरातील खाणी व जंगलातील संपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. ग्रामपातळीपासून झोनपातळीपर्यंत हे केडर काम करते. शस्त्रे मिळवण्यासाठी पोलिसांवर हल्ले केले जातात. गडचिरोली भागात अनेक दुर्गम व जंगल परिसरात यांचे वास्तव्य असते. प्रत्येक गावात त्यांचे खबरी परसलेले आहेत. गनिमी काव्याच्या माध्यमातून ते पोलिसांवर हल्ले करतात. 

ते म्हणाले, लोकशाहीत आपल्याला न्याय मिळू शकत नाही, असे सांगून लोकांना शस्त्रे हाती घेण्यास भाग पाडले जाते. या भागातील अनेक लोकांना मोबाईल, टी.व्ही. म्हणजे काय, हेदेखील माहीत नाही. सध्या नक्षलाईट केडरमध्ये शिक्षित मुलांची संख्या वाढू लागली आहे. हा सर्वात मोठा धोका आहे. त्यांचे प्रबोधन करून त्यांना यापासून परावृत्त करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत अ‍ॅड. राजेंद्र किंकर यांनी केले. आभार श्रीकांत लिमये यांनी मानले. सूत्रसंचालन नंदकुमार मराठे यांनी केले. यावेळी तुषार तेंडुलकर, डॉ. उदय कुलकर्णी उपस्थित होते.