Wed, Mar 27, 2019 03:55होमपेज › Kolhapur › शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदलाची गरज : डॉ. योगेश जाधव 

शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदलाची गरज : डॉ. योगेश जाधव 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

डिजिटल युगातील नवी पिढी खूप स्मार्ट आहे. इंटरनेटमुळे त्यांचे जग बदलले असून, शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदलाची गरज आहे. शिक्षणाबरोबरच मुलांना शालेय स्तरावर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिल्यास देश महासत्ता होईल, असे प्रतिपादन दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संचालक, संपादक डॉ. योगेश जाधव यांनी केले.

स्टार अ‍ॅकॅडमी, नागाव यांच्या वतीने ‘शोध शिक्षणातील तार्‍यांचा’ गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ. जाधव म्हणाले, शाळांमध्ये स्मार्ट क्‍लास रूम ही संकल्पना राबविली जात आहे. त्यामुळे शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शिकवावे लागणार आहे. वर्गात बसून शिक्षण घेण्याची आज गरज राहिलेली नाही. वेबीनारच्या माध्यमातून कोठेही बसून विद्यार्थांना शिकता येणार आहे. शिक्षण ही श्रीमंतांची मक्‍तेदारी राहणार नाही. 

18 व्या शतकात अ‍ॅरिस्टॉटल यांनी वॉकिंग स्कूल व टॉलस्टॉय यांनी वेगळ्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सद्यःपरिस्थितीत परभणी येथील शिक्षक युवराज माने शेती, पर्यावरणाची माहिती देत विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. कोल्हापुरात सृजन आनंद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्मशानभूमी दाखविण्याचा वेगळा उपक्रम राबवून त्यांच्या मनातील भीती घालविली आहे. शिक्षकांना आज अशा प्रकारचे प्रयोग करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी परिपूर्ण कसे व्हावे, हे त्यांच्या मनात बिंबवावे लागणार आहे.

भारत 2020 मध्ये जगातील सर्वात युवा देश असणार आहे. देशाची 65 टक्के लोकसंख्या 30 वयोगटातील असेल. शिक्षक नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न करतील, असा विश्‍वास यावेळी डॉ. जाधव यांनी व्यक्‍त केला. आदर्श विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. स्टार अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष दीपक शेटे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी ‘गणिताचा कोष’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. विकास सलगर,  आण्णासाहेब मगदूम, प्रा. डी. एस. घुगरे, अमोल कोरगावकर, एस. डी.लाड, दादासाहेब लाड आदी उपस्थित होते. अ‍ॅकॅडमीचे उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आभार मानले. 

पुरस्कार विजेते..

स्टार संस्थापक पुरस्कार : जयंत आसगावकर, अशोक चराटी, अशोक पाटील. स्टार मुख्याध्यापक पुरस्कार : भगवंत पाटील, सुरैय्या मुजावर, संतोष पाटील. स्टार आदर्श शिक्षक पुरस्कार : भारत सावळवाडे, इकबाल मुजावर, महेश सूर्यवंशी. स्टार उपक्रमशील शिक्षक पुरस्कार : सुधाकर निर्मळे, अशोक कांबळे, राहुल फुटाणे. स्टार शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार :  बजरंग गरूड, पांडुरंग जाधव. स्टार आदर्श शाळा पुरस्कार : बळवंतराव यादव हायस्कूल, पेठवडगाव; विद्यामंदिर भैरेवाडी, ता. कागल.

विद्यार्थ्यांच्या कलेला उत्स्फूर्त दाद

आदर्श विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी योगा व पेठवडगावच्या आदर्श गुरुकुल विद्यानिकेतन व ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जंप रोपची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली. मिणचे येथील आदर्श विद्यानिकेतनने तुफान आलंया, वंदेमातरम आणि गायक अभिजित भिसे व सहकार्‍यांनी समाजप्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून प्रबोधन केले. व्यक्‍तीच्या नावातून गणेशमूर्ती साकारण्याच्या गणेश तुरंबेकर या विद्यार्थ्याच्या कलेस मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

 

Tags : kolhapur, kolhapur news, education system, change, Dr Yogesh Jadhav,


  •