होमपेज › Kolhapur › गंभीर त्रुटींमुळे ‘नेचर इन नीड’चा ठेका रद्द

गंभीर त्रुटींमुळे ‘नेचर इन नीड’चा ठेका रद्द

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:58PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कामकाजातील गंभीर त्रुटींमुळेच मे. नेचर इन नीड (सातारा) या संस्थेला दिलेला ठेका रद्द करण्यात आला आहे. तसेच संबंधित संस्थेने महापालिकेचे 60 हजार भुईभाडे थकविले असून, 53 लाख 67 हजार 600 रुपये रॉयल्टीही जमा केलेली नाही. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच जैववैद्यकीय कचर्‍याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने सील करून ताब्यात घेतला आहे. कोल्हापूर शहर व परिसरातून रोज सुमारे 800 किलो जैववैद्यकीय कचरा जमा होत असून, गुरुवारपासून महापालिकाच हा प्रकल्प चालवेल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेच्या मालकीच्या लाईन बझार येथील ड्रेनेज प्लँटजवळील स्लॉटर हाऊससाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी दहा हजार चौरस फूट खुली जागा नेचर इन नीड संस्थेला चौ.फुटास एक रुपया वार्षिक भाड्याने 10 वर्षे मुदतीने व मासिक रॉयल्टी 1 लाख 8 हजार भरण्याच्या अटीवर 11 सप्टेंबर 2012 पासून देण्यात आली होती. परंतु, संस्थेच्या कामकाजातील गंभीर त्रुटींमुळे आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या कारणास्तव संबंधित संस्थेकडून होत असलेला निष्काळजीपणा व कामातील गंभीर त्रुटींमुळे 21 सप्टेंबर 2013 ला संस्थेस दिलेला ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर हरित प्राधिकरण न्यायालय (पुणे) यांनी 5 मे 2014 रोजीच्या आदेशानुसार संस्थेकडून शहराअंतर्गत निर्माण होणारा जैव व वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचे काम तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येत होते. 

नेचर इन नीड ही संस्था संबंधित जागेचा वापर करत असूनही भुईभाडे थकविले आहे. तसेच रॉयल्टीची रक्‍कम भरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 81 ब अन्वये जागा ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवून गुरुवारी प्रकल्प सील करून इस्टेट विभागाने ताब्यात घेतला आहे. जैव व वैद्यकीय कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली असून, महानगरपालिका स्वत: सक्षमपणे जैव व वैद्यकीय कचरा प्रकल्प चालवणार आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक व 12 कर्मचार्‍यांची नियुक्‍ती केली आहे. जैववैद्यकीय कचरा संकलन करण्यासाठी स्वतंत्र 4 वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणचा ईटीपी, चिमणी इत्यांदी बाबीकरिता स्वतंत्र तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला आहे, असेही महापालिकेने पत्रकात म्हटले आहे.