Fri, Apr 26, 2019 01:52होमपेज › Kolhapur › अधिकारी, कर्मचार्‍यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा ‘प्राण’

अधिकारी, कर्मचार्‍यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा ‘प्राण’

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 12:24AMकोल्हापूर : नसिम सनदी

शिक्षक वगळता उर्वरित सर्व कर्मचार्‍यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अर्थात एनपीएसकडे वर्ग करण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्णत्वास गेले आहे. अशाप्रकारे 100 टक्के नोंदणी करणारी कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे. 1516 कर्मचार्‍यांचे 40 कोटी रुपये एनएसडीएलकडे वर्ग झाले आहेत. या योजनेंतर्गत आता राष्ट्रीय पातळीवरील ‘प्राण’ कार्ड सर्व कर्मचार्‍यांना प्राप्त झाले आहे. दरम्यान, शिक्षकांचा जुन्याच पेन्शनसाठीचा आग्रह कायम असल्याने त्यांना अजून यात सामावून घेतलेले नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने हे काम पूर्णत्वास नेले आहे. 1 एप्रिलपासून अंशदायी पेन्शन योजनेच्या राज्य सरकारच्या कक्षेतील डीपीएस प्रणालीत असलेले सर्व कर्मचारी आता एनपीएसमध्ये समायोजित झाली आहेत. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना राष्ट्रीय पातळीवर सुरक्षा कवच प्राप्त झाले असून सुटसुटीत प्रणाली असल्याने पैसे काढणे, ठेवणे अधिक सुलभ झाले आहे. शिवाय एका क्लिकवरील आपली पेन्शनच्या संदर्भातील माहिती उपलब्ध झाली आहे.2009 मध्ये जिल्हा परिषद कर्मचारी घ्यावेत, असे आदेश आले; पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने सोपी सुटसुटीत अशी एनपीएस प्रणाली आणली, त्यात राज्य सरकारने 2014 मध्ये सहभाग घेत आपले कर्मचारी तिकडे वर्ग केले. तथापि जिल्हा परिषदांमध्ये हे होऊ शकले नाही.अखेर राज्य शासनाने सूचना दिल्याने सर्व जिल्हा परिषदा कामाला लागल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाचे उपमुख्य वित्त लेखाधिकारी राहुल कदम यांच्या पाठपुराव्याने 1 एप्रिल 2018 ही डेडलाईन निश्‍चित करून त्याप्रमाणे नियोजन करत एनपीएसची नोंदणी प्रक्रिया पूर्णत्वास गेली.शिक्षकांचे होणार नुकसान जिल्हा परिषदेतील सर्व 1516 कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेकडे वर्ग होत असताना सर्वात मोठे केडर असलेले शिक्षक मात्र या योजनेपासून बाहेर आहेत. अंशदायी पेन्शन योजनेला विरोध म्हणून 2009 पासून शिक्षक संघटना आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे पेन्शनचा वाटा कुणी जमा करायचा हे न ठरल्याने 2015-16 या एका वर्षातील पेन्शनची शिक्षकांची रक्कम जमाच झालेली नाही. त्यामुळे दोन वर्षांच्या निवृत्ती वेतनाच्या पावत्याही निघू शकलेल्या नाहीत. या पेन्शन योजनेला विरोध केल्याने शिक्षकांना दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

Tags : kolhapur Z P, National Pension Scheme for Employees