Sun, Nov 18, 2018 11:49होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला  पुन्हा ‘स्वप्नांचे’ पंख

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला  पुन्हा ‘स्वप्नांचे’ पंख

Published On: May 11 2018 1:56AM | Last Updated: May 11 2018 12:04AMकोल्हापूर : विजय पाटील 

जुना बुधवार पेठेतील मेघप्रवण पवार या तरुणाने  कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाला पुन्हा स्वप्नांचे पंख लावले आहेत. मेघप्रवणच्या ‘हॅपी बर्थडे’ या लघुपटाला  राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नवी दिल्ली येथे त्याने हा पुरस्कार स्वीकारला.  कोल्हापूरच्या तरुणाईला यामुळे चित्रपटसृष्टीची चमचमती दुनिया पुन्हा खुणावू लागली आहे. 

कोल्हापूर ही चित्रपटसृष्टीची पंढरी आहे. मूकपटापासून ते बोलपटापर्यंत या पाऊणशे वर्षांहून अधिक कोल्हापुरी चित्रपरंपरेच्या काळाने चित्रपटसृष्टीवर अक्षरश: राज्य केले. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी जसा पहिला कॅमेरा कोल्हापुरात तयार केला त्याचप्रमाणे प्रभात फिल्म कंपनीने  ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला बोलपट कोल्हापुरातच तयार केला.

प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलेले जुन्या पिढीतील पृथ्वीराज कपूर, राजकपूर यांसारख्या बुजुर्गांनी भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटात भूमिका केल्या. असंख्य कलाकार, तंत्रज्ञ या मातीने चित्रपटसृष्टीला दिले. ‘सूनबाई’, ‘मीठ-भाकर’, ‘साधी माणसं’ हे कोल्हापुरी मातीचा गंध असलेले चित्रपट तर मराठी रसिकांच्या काळजाला भिडले. कोल्हापूरच्या माणसांनी व तंत्रज्ञांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक सोनेरी युगच निर्माण करून ठेवले. चित्रतपस्वी व्ही. शांतारामबापूंनी तर चित्रपटाची भाषाच बदलून टाकली. त्यामुळे कोल्हापूर म्हणजे चित्रपटसृष्टीची राजधानी असे समीकरण बनले होते. 

कुठलाही ख्यातनाम कलाकार कोल्हापुरात आला तर तो इथली माती कपाळाला लावून या भूमीबद्दल आदर व्यक्‍त करताना अनेकांनी पाहिले आहे. मध्यंतरीच्या काळात मुंबई हीच चित्रपटसृष्टीची (बॉलीवूड) राजधानी बनली आणि आतासुद्धा आहे, तर पुण्याच्या कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीवर मोहर उमटवली आहे. अगदी सोलापूर जिल्ह्यातही अनेक तरुण पुढे येऊन चित्रपटासारख्या बेभरवशाच्या मायावी दुनियेत यशाला गवसणी घालू लागले आहेत. 

या चमचमत्या नकाशात कोल्हापूर कुठेच दिसत नव्हते, पण आता पुन्हा काही तरुण कोल्हापूरची चित्रपट परंपरा जोमाने पुढे आणू लागले आहेत. कोल्हापूरची संस्कृती जपणार्‍या जुना बुधवार पेठेतील मेघप्रवण पवार या उमद्या तरुणाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून ‘नादखुळा’ सुरुवात केली आहे. पेठांनी सुरुवात केली की ती जिल्हाभर पसरते, असे स्थानिक चित्र असते. मेघप्रवणचा हा कित्ताही कोल्हापुरी तरुणाईला असाच वेड लावेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. असे झाले तर मराठीच्या प्रभात काळाचा उदय पुन्हा कोल्हापुरात होण्यास वेळ लागणार नाही.

इंजिनिअर ते लघुपट निर्माता

मेघप्रवण पवार हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो पुण्यात नोकरी करत असताना त्याने अलीकडे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणी त्याने ‘हॅपी बर्थडे’ हा मानवी नात्यांचा भावनिक बंध सांगणारा पंधरा मिनिटांचा लघुपट बनवला. या लघुपटाला 65 व्या राष्ट्रीय पुरस्कारात स्थान मिळाले. 

कोल्हापूरची चित्रपट परंपरा जागतिक दर्जाची आहे, मला याची जाणीव आहे. वास्तव कथेवर काम करण्याचा माझा मानस आहे. मी फिल्म इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी असताना लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे कौतुकास्पद असले तरी आता माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. - मेघप्रवण पवार