Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Kolhapur › कुरुंदकर, राजेश पाटील यांची नार्को टेस्ट करा

कुरुंदकर, राजेश पाटील यांची नार्को टेस्ट करा

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 1:34AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे बेपत्ताप्रकरणी मुख्य संशयित व वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यांच्या चौकशीतून अद्याप काहीही ठोस माहिती उपलब्ध झाल्याचे दिसून येत नाही. या प्रकरणाचा छडा लागण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी अश्‍विनीचे पती राजू गोरे व भाऊ आनंद बिंद्रे यांनी बुधवारी केली.

राजू गोरे व आनंद बिंद्रे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापूर येथून निवेदन पाठविले. त्यात प्रामुख्याने ‘नार्को टेस्ट’वर भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे. अभय कुरुंदकर, पाटीलसह अन्य साथीदारांनी संगनमत करून अश्‍विनीचा घातपात केला आहे. अशी गंभीर तक्रार करूनही गृहखात्याने आजवर  घटनेची दखल घेतली नाही. परिणामी न्यायासाठी आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली. तरीही या घटनेकडे शासनाचेे दुर्लक्ष झाले आहे. असेही नमूद करण्यात आले आहे.

कुरुंदकर, पाटील यांच्या चौकशीतून सद्य:स्थितीत जी काही माहिती माध्यमांद्वारे जाहीर करण्यात येत आहे, ती यापूर्वीच निष्पन्न झालेली आहे. त्यात नवीन काहीही नाही. राजेश पाटील हा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. माजी मंत्री खडसे यांचा भाचा असल्याने पोलिस चौकशीत हस्तक्षेप होण्याची शक्यता अधिक आहे. किंबहुना त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. असेही गोरे व बिंद्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकरणाची सखोल व कसून चौकशी होण्याची आवश्यकताआहे. त्यामुळे संशयितांच्या नार्कोटेस्टशिवाय पर्याय नाही. दि. 15 डिसेंबरला संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. त्यानंतर नेमकी कोणती भूमिका घ्यायची, याचा गोरे व बिंद्रे कुटुंबीयांचा निर्णय होईल,असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.