Sat, Mar 23, 2019 12:13होमपेज › Kolhapur › राणेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज : आ. क्षीरसागर

राणेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज : आ. क्षीरसागर

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 10 2017 12:43AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नामोनिशाण मिटविण्याची भाषा करणार्‍या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचे पत्रक आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीला दिले आहे. तर शिवसेनेवर टीका करण्याची राणेंची योग्यता नाही, असे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी पत्रकात म्हटले आहे. शुक्रवारी येथील जाहीर सभेत राणे यांनी केलेल्या वक्‍तव्याचा या दोघांनीही निषेध केला आहे.

आ. क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या शिवसेनेच्या सहा जागा शुन्यावर आणणार असे अकलेचे तारे तोडत राणे यांनी स्वतःचा टी.आर.पी. वाढविण्याचा बालिश प्रयत्न केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आणि सेना मिटवण्याची स्वप्ने पाहणारे अनेकजण मातीमोल झाले आहेत. त्यांना समाजात कवडीचीही किंमत नाही.

खुर्चीच्या धुंदीत सरड्याप्रमाणे रंग बलणार्‍या नारायण राणेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. शिवसेनेच्या कृपेने अनेक पदे भोगलेल्या राणेंनी कोल्हापुरातील सभेसाठी मुंबई, पुणे आणि कोकणातून गाड्या भरून आणल्या आणि गर्दी केली. कोल्हापुरातील पाचशे लोक या सभेला नसतील. त्यामुळे विचलित झालेल्या राणेंनी कोणाची तरी लाचारी पत्करून शिवसेनेवर टीका केली. स्वाभिमानाची भाषा करणारे राणे स्वाभिमानी नसून गद्दार आहेत. जो माणूस खाल्ल्या मिठाला जागला नाही, त्याला शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही.

कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो शाबूत ठेवण्याची जबाबदारी आम्हा शिवसैनिकांची आहे. खुर्चीच्या मोहापायी तुकडा टाकेल तिकडे मान वळविण्याची लाचारी आम्हा शिवसैनिकांच्या रक्‍तात नाही. कोल्हापूरला मंत्रिपद मिळाले नाही, याची काळजी राणेंनी करू नये. पक्ष नेतृत्वावर आमचा विश्‍वास असून जिल्ह्यात असणार्‍या सहा आमदारांची संख्या पुढील विधानसभेनंतर दहा असेल; पण राणेंचा पक्ष रसातळाला जाईल, असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

संजय पवार यांनी याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे की, स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांची शिवसेनेवर टीका करण्याची योग्यता नाही. राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करून हतबलता सिद्ध केली आहे. त्यांनी दिल्ली-गुजरातच्या वार्‍या कोणत्या हेतूने केल्या हे महाराष्ट्राला माहिती आहे. राणे यांची दसरा चौकातील कोपरा सभा होती, हे त्यांनी लक्षात ठेवावे. खूप इच्छा असूनही कोणताच पक्ष जवळ करीत नाही म्हणून कोणाच्या तरी सांगण्यावरून शिवसेनेवर टीका करणे दुर्दैवी आहे. यामागचा बोलविता धनी कोण, हे सर्वांना समजले आहे.

जनतेला आपल्या पक्षात येण्याचे आवाहन करण्यापेक्षा प्रथम स्वतःच्या मुलाला आणूनच दुसर्‍यांना सल्ले देणे योग्य ठरेल. राजकारण फक्‍त अर्थकारणावर चालत नसून चारित्र्यसंपन्‍न व्यक्‍तीवर चालते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ठाकरे यांनी जनतेचे नि:स्वार्थीपणे कामे केले; पण राणेंचा मुलांसाठी खटाटोप सुरू आहे तो यशस्वी होणार नाही. त्यांनी शिवसेनेला शहाणपण शिकवू नये. महाराष्ट्रातील शिवसैनिक त्यांच्या पक्षाची धूळदाण करतील. टक्केवारी घेणारा पक्ष अशी टीका करणार्‍यांनी स्वतः किती चोख कारभार केला हे जनतेला माहिती आहे. मुख्यमंत्री असताना कोणाचे कल्याण केले हे जाहीर करून सत्तेसाठी पक्ष बदलणार्‍यांनी शिवसेनेला उपदेशाचे डोस पाजणे हा सर्वात मोठा विनोद आहे.