Thu, Nov 15, 2018 16:23



होमपेज › Kolhapur › मातृवंदना योजनेसाठी माहिती संकलित

मातृवंदना योजनेसाठी माहिती संकलित

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 26 2017 11:49PM

बुकमार्क करा





नानीबाई चिखली : वार्ताहर  

जिल्ह्यातील गरोदर मातांना नववर्षात आता ‘मातृवंदना’ योजनेचा लाभ मिळणार असून त्या अंतर्गत प्रसूतीपर्यंत पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. केंद्र शासनाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येत्या जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत गरोदरपण ते बाळाच्या जन्मापर्यंतचा कालावधीत तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपयांचा लाभ संबंधित महिलेला दिला जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेसाठी 865 गर्भवतींची माहिती संकलित करण्यात आली आहे. मात्र, यासाठी गरोदर महिलेने शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदरपणाची नोंद करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाच्या वतीने गेल्या वर्षी मातृवंदना योजना सुरू करण्यात आली होती; पण जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी येत्या जानेवारीपासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे. गावागावांतील ‘आशा’ कर्मचार्‍यांवर यांची सर्वाधिक जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांना याचा मोबदलाही वाढवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. मातृवंदना योजनेचा उद्देश सरकारी दवाखान्यांमध्ये प्रसूती वाढवण्याचा आहे. जिल्ह्यात वर्षभरातील सर्व प्रसूती या खासगी अथवा शासकीय रुग्णालयात होत आहेत. या योजनेतून प्रसूतीला आर्थिक मदतीचे कवच दिले जाणार आहे. यासाठी मदतीचे तीन टप्पे आहेत.

त्यानुसार महिलेच्या गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यांत सरकारी दवाखान्यात नोंदणी केल्यास 1 हजार रुपये, 9 व्या  महिन्यांपर्यंत 2  हजार रुपये आणि  प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाला तीन महिन्यांत संपूर्ण डोस दिले असतील तर उर्वरित रक्कम म्हणजेच 2 हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच मागास प्रवर्गातील महिलांना ग्रामीण भागांमध्ये 700 व शहरी भागात 600 रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाणार आहे. संबंधित मातेचे आधार कार्ड, बँक पासबुकची नोंद जवळच्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्येच नोंद करणे आवश्यक आहे. गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यांत शासकीय रुग्णालयांमध्ये नोंदणी केल्यानंतर प्रसूती खासगी रुग्णालयात झाली तरीदेखील त्या महिलेच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मात्र, फक्त खासगी रुग्णालयातच गरोदरपणातील नावनोंदणी केलेल्या महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांकडून ही माहिती सध्या तालुका पातळीवर संकलित केली जात असून, आजअखेर 865 महिलांची माहिती भरली आहे. नवीन वर्षात त्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. या योजनेचा लाभ फक्त पहिल्या प्रसूतीसाठीच मिळणार आहे.