होमपेज › Kolhapur › विठ्ठलनामाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

विठ्ठलनामाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

माऊली-विठोबा... माऊली.. माऊली.. विठोबा-माऊली असा अखंड जयघोष... हाती भगव्या पताका... टाळ-मृदंगाचा गजर...डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला. मुखी विठ्ठल नाम. मध्यभागी माऊलींची चांदीची पालखी आणि भोवतीने फिरणारे अश्‍व. अधूनमधून कोसळणार्‍या पावसाच्या रिमझिम सरी अशा विठ्ठलमय वातावरणात सोमवारी नंदवाळ दिंडीतील रिंगण सोहळा पुईखडी येथे पार पडला. या भक्‍तिमय सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी लाखोंच्यावर भाविकांची मांदियाळी जमली होती. 

कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील श्री विठ्ठल मंदिरातून सकाळी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथामध्ये चांदीच्या पालखीत संत ज्ञानेश्‍वर माऊलींची मूर्ती व पादुका प्रतिष्ठापित करण्यात आली होती.सकाळी नऊच्या सुमारास पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सुजित चव्हाण, जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे, ह.भ.प. बाळासाहेब पोवार, ह.भ.प आनंदराव लाड, दीपक गौड यांच्या हस्ते  पालखीचे पूजन झाले. त्यानंतर पालखी पुईखडीच्या दिशेने प्रस्थान झाली. विणेकरी, टाळ-मृदंगाचा गजर, मानाचे अश्‍व, सजवलेल्या बैलगाड्या, मानदंड धरणारे (चोपदार) आणि विठ्ठलनामाचा गजर करणारे वारकरी अशी पायी दिंडी सुरू झाली. अत्यंत शिस्तबंद्ध रितीने भजन करीत दिंडी बिनखांबी गणेश मंदिर येथून मार्गस्थ झाली. ही दिंडी निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, खंडोबा तालीम, जुना वाशी नाका, साने गुरुजी वसाहतीमार्गे पुईखडी येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालया समोरील पुईखडीच्या माळावर आली.दुपारी पावणेदोनच्या सुमारास रिंगण सोहळा झाला. 

येथे महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या उपस्थित पालखीचे पूजन झाले. दरम्यान, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेेश क्षीरसागर यांच्यासह राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. प्रथम पथाका, टाळ-मृदंग, विणेकरी, महिलांनी डोक्यावर घेतलेले तुळशी वृंदावन, पालखी आणि अश्‍व असे रिंगण झाले. अश्‍वानी केलेले रिंगण सोहळा भाविकांनी ‘याचि देहा याची डोळा’ अनुभवला.अश्‍व धावलेल्या मार्गावरील माती कपाळाला लावण्यासाठी भविकांनी एकच गर्दी केली. भाविकांच्या दर्शनानंतर पालखीचे नंदवाळच्या दिशने प्रस्थान झाले. दिंडीतील पालखी भक्‍तांनी दिलेल्या चांदी देणगीतून तयार करण्यात आली आहे. अजूनही पालखीसाठी चांदीची गरज असल्याने पिरवाडी येथील पांडुरंग मिठारी यांनी चांदी दान दिली. दिंडी अबाल वृद्धांसह तरुणांनी मोठी उपस्थिती लावली होती. महाविद्यालयीन युवक-युवती हातात टाळ घेऊन विठ्ठल नामाचा गजर  करीत चालत होते. पुईखडी टेकडीवर हातातील भगवी पताका नाचवीत भक्‍तीत दंग झाले होते. छायाचित्रणाचा छंद असणार्‍या तरुणाई हातात कॅमेरे घेऊन हा सोहळा टिपत होते. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून जवळपास 30 ते 40 दिंड्या रिंगणसोहळ्यामध्ये सहभागी होत्या. लहान मुले - मुली विठ्ठल-रुक्माईचा वेश धारण करून दिंडीत सहभागी झाले होते. अनेकांनी सेल्फीचा आनंदही घेतला. 

फराळ, केळींसह आरोग्य सेवा देखील दिंडी मार्गावर होती. शहरातील व लगतच्या गावातील तरुण मंडळे, तालीम संस्था, सेवाभावी संस्थांनी वारकर्‍यांसाठी खिचडी, राजिगरा लाडू, दूध, केळींचे वाटप केले. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूध वाटण्यात आले. शासनाची रुग्णवाहिका दिंडी मार्गावर आरोग्य सेवेसाठी तत्पर होती. रिंगण सोहळ्याचे संयोजन जय शिवराय फुटबॉल क्‍लब व श्री ज्ञानेश्‍वर माऊली भक्‍त मंडळ यांनी केले. रिंगण सोहळ्याप्रसंगी ह.भ.प. एम. पी. पाटील यांनी भारदस्त सूत्रसंचालन करून रिंगण सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

दिंडी मार्ग अन् पुईखडी चकाचक 

नंदवाळला जाणार्‍या  वारकर्‍यांना शहरातील व लगतच्या गावातील तरुण मंडळे, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तालीम संस्था यांनी फराळाचे वाटप केले. रस्त्यावर आणि कडेला पडलेला कचरा भक्‍ती गंध सेवा प्रतिष्ठानच्या  कार्यकर्त्यांनी चकाचक केला. सेवा मार्गावर अखंड ही सेवा सुरू होती.

सूर्यवंशी बहीण-भाऊ दिंडीचे आकर्षण 

दिंडीत अबालवृद्धांचा मोठा सहभाग होता. वारकरी वेशात अनेकजण सहभागी झाले होते, पण अनिष सूर्यवंशी व ज्ञानेश्‍वरी सूर्यवंशी यांनी विठ्ठल -रुक्माईची वेशभूषा करून दिंडीचे लक्ष वेधले. अनिष व ज्ञानेश्‍वरी सोबत सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. 

अशीही सेवा...!

 पुईखडी येथे नाना पाटील नगरमधील विठ्ठल भक्‍त किसन गायकवाड यांनी वारकर्‍यांच्या तुटलेल्या चप्पला मोफत शिवून दिल्या. सकाळी अकरापासून ते पावसात सेवा देत होते. श्रीराम ट्रेडर्सच्या वतीने साने गुरूजी पेट्रोल पंपाजवळ श्री विठ्ठालाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. येथे दर्शनासाठी गर्दी झाली होती. 

चोख पोलिस बंदोबस्त अन्... पार्किंग व्यवस्था

रिंगण सोहळ्याला जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून भक्‍तांनी हजेरी लावली होती. त्यामुळे पुईखडी घाटात वाहनांची गर्दी टाळण्यासाठी कोल्हापूर ट्राफिक पोलिसांनी दुचाकी व चार चाकी वाहनांचे स्वतंत्र पार्किंग केले होते. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी पिरवाडी वाशीकडून येणारी वाहतूक मंगलकार्यालयाच्या मागून क्रांतिसिंह नाना पाटील नगरकडे वळविली.त्यामुळे गर्दी टळली. 
असाही प्रामाणिकपणा 
 यंदा रिंगण सोहळ्याला भक्‍तांची मोठी गर्दी होती. भक्‍तिमय रिंगणसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भक्‍तांनी एकच गर्दी केली होती. यामध्ये महिलांचीदेखील मोठी उपस्थिती होती. यामध्ये सुवर्णा तडुळे यांना सोन्याचा जिन्‍नस सापडला होता. तडुळे यांनी तो जिन्‍नस संयोजन समितीकडे आणून दिला. संयोजन समितीने जिन्‍नस कोणाचा आहे असे आवाहन केले. यानंतर सविता पोवार यांनी ओळख पटवून जिन्‍नस ताब्यात घेतला. तडुळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वारकर्‍यांनी भरभरून कौतुक केले.