Tue, Apr 23, 2019 13:58होमपेज › Kolhapur › ...तर नगरोत्थान योजनेचा 17 कोटी निधी परत जाणार

...तर नगरोत्थान योजनेचा १७ कोटी निधी परत जाणार

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 1:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

नगरोत्थान योजनेची 17 कोटी रुपयांची कामे प्रलंबित असून ती  15 मार्चपूर्वी पूर्ण न केल्यास हा निधी परत जाणार आहे. त्यामुळे 15 मार्चपर्यंत ही कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही प्रशासनाने स्थायी समिती सभेत दिली. नूतन सभापती आशिष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली  समितीची पहिलीच बैठक शनिवारी झाली. 

या बैठकीत नगरोत्थान योेजनेतील किती कामे प्रलंबित आहेत. 15 दिवसांत कामे पूर्ण झाली नाहीत तर आहे त्या स्थितीत प्रकल्प बंद करावा, अशा शासनाने सूचना दिल्या आहेत का? मंगळवारी होणार्‍या महासभेत नगरोत्थान फेज दोनसाठी नवीन निधी मागणीचा ठरावा करावा, अशी विचारणा सत्यजित कदम, संदीप नेजदार आणि सभापती आशिष ढवळे यांनी केली. यावर प्रशासनाने 17 कोटी रुपयांची कामे प्रलंबित आहेत. ही कामे 15 मार्चपूर्वी पूर्ण न केल्यास हा निधी परत जाणार आहे. रेणुका मंदिर रस्ता, आयसोलेशन, शास्त्रीनगर, लक्ष्मीपुरी या रस्त्यांचे डांबरीकरण अपूर्ण  आहे.

15 मार्चपर्यंत जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. तीन शववाहिका असूनही चालकाविना नागरिकांची गैरसोय होत असल्याकडे लक्ष वेधून अशा चालकांना कामावरून काढून टाका, अशी मागणी दीपा मगदूम यांनी केली. यावर दहा वाहन चालकांची भरती करण्यात येईल, असे सांगण्यात आले. अतिक्रमण हटाव कारवाई केवळ उपनगरात होते शहरात का नाही, शहरात कारवाई करा कोणीही सदस्य अडविणार नाही. अशी सूचना डॉ. संदीप नेजदार, सौ. दीपा मगदूम आणि सभापती आशिष ढवळे यांनी केली. पोलिस बंदोबस्त मिळाला नसल्याने कारवाई थांबविली असून पुढील आठवड्यात कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

सफाई कामगार पहाटे सहा वाजता हजेरी देतात. मात्र, साडेसातपर्यंत कामावर येत नाहीत त्यामुळे या कामगारांची कामाची पहाटे सहा ते दोन ऐवजी सात ते तीन अशी करावी, अशी सूचना सभापती आशिष ढवळे यांनी केली. सकाळी सात ते दुपारी तीन असा प्रस्ताव ठेवू, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. तसेच  उपनगरात सफाई कर्मचारी कमी असून मुख्य आरोग्य निरीक्षक लक्ष देत नसल्याचा आरोप गीता गुरव यांनी केला. सफाई कामगार कमी असल्याने ही समस्या असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. राजारामपुरी खाऊगल्लीत गाड्या वाढत असून पार्किंगला त्रास होतो. त्यामुळे बेकायदेशीर गाड्या काढून टाकाव्यात, अशी मागणी सत्यजित कदम आणि संजय मोहिते यांनी केली.

अतिक्रमण आणि वॉर्ड कार्यालयामार्फत मंगळवारी अतिक्रमण कारवाई करू, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. जेट मशिन बंद का आहे, नवीन जेट मशिनचे काय झाले, अशी विचारणा संजय मोहिते आणि सौ. प्रतिज्ञा निल्ले यांनी केली. नवीन मशिनचा प्रस्ताव आहे. जुने मशिन सुरू असून प्रेशर नसल्याने काम पूर्ण होत नाही. असे सांगण्यात आले. बंद शाळा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाचे काय झाले? प्रतिसाद कसा आहे, अशी विचारणा भाग्यश्री शेटके यांनी केली. निविदा काढल्या होत्या. रेडीरेकनरप्रमाणे भाडे आकारणी होती. निविदेस प्रतिसाद नाही. राजारामपुरीतील नऊ नंबर शाळा खासगी संस्थेने मागितली होती. परंतु, महासभेने हा ठराव नामंजूर केला आहे. पुन्हा निविदा काढू, असे सांगण्यात आले.